माद्रिद ओपनमध्ये बोपण्णा-क्मयुवेसचा पराभव

0

माद्रिद । भारताचा प्रमुख टेनिसपटू रोहन बोपण्णा व त्याचा उरुग्वेयन साथीदार पाब्लो क्मयुवेस यांचे येथे सुरू असलेल्या माद्रिद मास्टर्स खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. बिगरमानांकित बोपण्णा-क्मयुवेस यांना फॅब्रिस मार्टिन व डॅनियल नेस्टर या फ्रान्स-कॅनेडियन जोडीकडून 3-6, 2-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. गेल्या महिन्यात बार्सिलोना ओपन स्पर्धेतही बोपण्णा-क्मयुवेस यांना पहिल्याच फेरीत चकित व्हावे लागले होते. त्या स्पर्धेत अग्रमानांकित हेन्री कोन्टिनेन व जॉन पीयर्स या जोडीकडून ते पराभूत झाले होते.

अग्रमानांकित मरे दुसर्‍या फेरीत
दुहेरीच्या मानांकनात बोपण्णा सध्या 18 व्या क्रमांकावर असून क्मयुवेस दुहेरीत 24 तर एकेरीत 26 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी बोपण्णा-क्मयुवेस यांनी माँटे कार्लो ओपन स्पर्धेत जेतेपद मिळविताना स्पेनच्या फेलिसियानो लोपेझ व मार्क लोपेझ यांचा पराभव केला होता. अग्रमानांकित अँडी मरेने माद्रिद ओपनमधील पदार्पणात विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याने रोमानियाच्या मेरियस कॉपिलचा पराभव केला. मरेने कॉपिलवर 6-4, 6-3 असा विजय मिळविताना एकही ब्रेकपॉईंटची संधी दिली नाही. मरेने येथील स्पर्धा 2008 व 2015 मध्ये जिंकली होती तर गेल्या वषी त्याने उपविजेतेपद मिळविले होते. आठव्या मानांकित डॉमिनिक थिएमने तिसरी फेरी गाठताना अमेरिकेच्या जॅरेड डोनाल्डसनवर 6-3, 6-4 अशी मात केली.