पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला पुण्यातून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार अशा आशयाची बातमी एका इंग्रजी वृत्तपत्रात बुधवारी छापून आली आणि येथील राजकीय क्षेत्रात धमाल उडाली.
माधुरी दीक्षित येथून उमेदवार म्हणून उभ्या रहाणार का? त्याचे परिणाम काय होतील? याविषयीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. भाजपच्या विद्यमान खासदारांची कामगिरी चमकदार नसल्याने येथे बदल घडणे अपेक्षित आहे त्यातून माधुरी दीक्षित यांचे नांव चर्चेत आले असावे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मोहन जोशी यांनी दिली. तर, ही बातमी गांभीर्याने घेवू नये असे मत भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केले.
भाजपमध्ये विद्यमान खासदार अनिल शिरोळे, पालक मंत्री गिरीश बापट आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले हे तिघेही इच्छुक आहेत. असे असताना आज अचानक माधुरी दीक्षित यांचे नांव चर्चेत आल्याने इच्छुकांचे समर्थक गोंधळले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी माधुरी दीक्षित यांची सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्या भेटीचा संदर्भ दीक्षित यांच्या उमेदवारीच्या बातमीबाबत होता. पुणेकर बाहेरचा उमेदवार स्वीकारतील का? कदाचित मुंबईत त्यांना उमेदवारी दिली जावू शकते असेही बोलले गेले. पुण्यात भाजप आणि काँग्रेस हे दोघेही निकराने निवडणुकीत उतरले असतानाच माधुरी दीक्षित यांच्या उमेदवारीची बातमी आल्याने राजकीय क्षेत्रात धमाल मात्र उडाली.
हे देखील वाचा