माध्यमिक शिक्षक विविध मागण्यांसाठी 23 व 24 रोजी संपावर

भुसावळ : नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच मध्यंतरीच्या काळात केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू केलेल्या सर्व सुविधा तात्काळ राज्यात लागू करा यासह अन्य न्याय मागण्यांसाठी 23 व 24 फेब्रुवारी 2022 या दोन दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ने राज्यव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्हा शिक्षक संघाचाही सहभाग
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघदेखील या राज्यव्यापी संपात सहभागी होणार आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या राज्यव्यापी संपात सहभागी व्हावे व संप यशस्वी करावा तसेच जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच जळगाव जिल्हा परीषदेने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संपाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवार, 24 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, जळगाव या ठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सेक्रेटरी एस.डी. भिरुड, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एच.जी.इंगळे, उपाध्यक्ष आर.आर.पाटील, साधना लोखंडे, कोषाध्यक्ष एस.एन.पाटील, संघटक बी.डी. महाले यांनी केले आहे.