मानवजातीला अर्थव्यवस्था हवी की अस्तित्व?

0

स्वित्झर्लंडमध्ये ‘दावोस’ येथे जागतिक आर्थिक मंचावर पंतप्रधानांनी, ’पृथ्वीची तापमानवाढ’ हे भीषण संकट असल्याचे व त्यावर सर्व देशांनी मिळून मात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र त्याआधी, राजस्थानात बाड़मेर येथे होणार्‍या, तापमानवाढीत भर घालणार्‍या तेल शुध्दीकरण कारखान्याचे भूमीपूजन करून ते दावोसला गेले होते. काँग्रेसने, या कारखान्याचे भूमीपूजन आपल्या पक्षाच्या सरकारने 2013 मध्येच केले असल्याचे सांगून आपले श्रेय असल्याचे म्हटले. रत्नागिरीतील रिफायनरीबाबत दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आहेत. पण दोघांच्याही दृष्टीने तापमानवाढीचा मुद्दा महत्वाचा नाही. देशातील इतर पक्षांची स्थिती वेगळी नाही.

अमेरिकेत व रशियात विक्रमी बर्फवृष्टी होत आहे. तापमान -60 अं.से. ते -70 अं. से. इतका नीचांक गाठत आहे. त्याचवेळी दक्षिण ध्रुवाजवळ ऑस्ट्रेलियात ’सिडनी’ येथे तापमानाने 48 अं.से. ते 50 अं.से. चा उच्चांक केला. मध्यपूर्वेत मुसळधार पावसामुळे महापूर आला व सहारा वाळवंटात बर्फाची चादर पसरली. या हजारो, लाखो वर्षांत न घडणार्‍या घटना पृथ्वीवर जीवनाची मृत्युघंटा वाजवत आहेत. पुढील धोक्याची सूचना देत आहेत. गतवर्षी मार्च एप्रिलमधील उष्णतेच्या लाटांमध्ये तामिळनाडूत व जगात इतरत्र लाखो मृत पक्ष्यांचा खच पडला. ओखी चक्रीवादळाने पश्‍चिम किनारपट्टीला समांतर वाटचाल करत लष्करी संचलनाप्रमाणे भारताला इशारा दिला. या घटनांमागे वाढत्या तापमानाचे समान सूत्र आहे. पक्ष्यांना याची जाणीव झाली तरी राजकीय पक्षांना अजून ती होत नाही. ते आर्थिक विकास व वृध्दीच्या, सतत विनाश घडवणार्‍या पाश्‍चात्य रूढ प्रतिमानाला धरून आहेत.

यवतमाळात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे 27 जण मृत्युमुखी पडले. याची चौकशी करणार्‍या समितीने योग्य काळजी न घेतल्याबद्दल शेतकर्‍यांनाच दोष दिला. त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न करणे व मृत्यूस कारण ठरल्याचा गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली. बहुतांश शेतकरी देखील शेतीत रसायने वापरण्याची कोणतीही गरज नाही, हे समजून घेत नाहीत. सन 1984 मध्ये युनियन कार्बाइडच्या वायु गळतीमुळे भोपाळला एव्हढा नरसंहार झाला. पण असा भयंकर विषारी वायू ज्या कीटकनाशकांच्या निर्मितीत वापरला जातो ती कीटकनाशके किती जीवघेणी असतील असा विचार शेतकरी, शहरी व ग्रामीण ग्राहक करत नाहीत. निसर्गापेक्षा वेगळ्या पद्धतीने कोणतेही (अधिकचे) अस्सल जैविक उत्पादन घेता येणार नाही. तशा प्रयत्नात विकृती निर्माण होणार. दावोसच्या पार्श्‍वभूमीवर रघुराम राजन यांनी देशाची अर्थव्यवस्था एका छोट्या कंपूच्या हाती गेल्याची रास्त टीका केली. संवेदनशील व उमद्या स्वभावाचे रघुराम राजन यांचा अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न होता. पण हा ’मानव’ शेवटी आधुनिक यंत्र – तंत्र वापरणारा आणि अर्थव्यवस्थेमुळे संमोहित झालेला शहरी मानसिकतेचा असतो. पृथ्वीवरील कोट्यावधी जीवजातींपैकी एक जीवजात या अर्थाने मानव म्हणून व जीवसृष्टीच्या द्रृष्टीने सजीव म्हणून हा विचार नाही. राजन, पायाभूत संरचनेत वाढ करणे, विकास दर आठ टक्क्यांंवर नेणे, रस्ते व मोटार निर्मिती सारख्या क्षेत्रांतून रोजगारासाठी मोठी गुंतवणूक करणे, अशाच विनाशकारी गोष्टी बोलतात. रोजगारनिर्मिती करण्याच्या कल्पनेने सर्वांना पछाडले आहे. पृथ्वीवर मानव सोडून इतर कोणताही सजीव रोजगार करत नाही. माणुसदेखील आपल्या देशात फक्त 50 – 60 व पाश्‍चात्य देशात शंभर – सव्वाशे वर्षांपूर्वी रोजगारासाठी धडपडत नव्हता.

पृथ्वीवर ’स्वयंपूर्णता’ ही सजीवांना मिळालेली अमूल्य देणगी आहे. आधुनिक मानवाने ती स्वतःच गमावली. राजन म्हणतात ‘हवामान बदल’ ही पाश्‍चात्य अर्थव्यवस्थेपुढील देशांपुढील समस्या आहे. ती केवळ अर्थव्यवस्थेपुढे समस्या नसून अस्तित्वापुढे आहे. ती मानवजातीपुढील समस्या आहे. राजन म्हणतात की, आर्थिक संकल्पना व वास्तव याबाबत अर्थशास्त्रज्ञांनी दुर्लक्ष करणे यापुढे चालणार नाही. पण खुद्द राजनसारख्यांचेही तापमानवाढीच्या वेगाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी व नेते, उद्योगपती, बँकर, नोकरशहा, अभियंते इ. यांनी सर्व मानवी सरकारांच्याही वर पृथ्वीचे वा निसर्गाचे एक सरकार आहे व त्याच्या दृष्टीने औद्योगिकरण, शहरीकरण व अर्थव्यवस्था हीच जीवनासाठी समस्या आहे हे लक्षात घ्यावे. लोकशाही व शोषणमुक्तीची मानवी संकल्पना अपुरी होती. तीने फक्त मानवी व्यवस्थेच्या मर्यादित परिघात विचार केला. ही चूक झाली. पृथ्वीच्या सरासरी तापमानात दर वर्षी होणारी एक पंचमांश अंश सेल्सिअस ची वाढ पाहता फक्त पुढील पाच वर्षात उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत 2 अं.से.ची वाढ होऊन मानवजात वाचवण्यासाठी ठेवलेले पॅरिस कराराचे उद्दीष्ट ओलांडले जाईल. बॉन परिषदेत जागतिक हवामान संघटनेच्या मांडलेल्या अभ्यासाप्रमाणे तापमान किमान 50 वर्षे वाढत राहणार आहे. याचा अर्थ या शतकात मानवजात व जीवसृष्टीचे पृथ्वीवरून उच्चाटन होईल. अशी आणिबाणीची स्थिती निर्माण झाली असताना केवळ भ्रमिष्ट किंवा अज्ञानी माणसेच अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या गोष्टी करू शकतात. रूढ अर्थाने ती किती बुध्दीवान आहेत याला काही महत्व नाही. दावोसपेक्षा बॉनची परिषद काय म्हणते हे महत्वाचे आहे. ’बिल गेटस’ सारखा उद्योजक कार्बन उत्सर्जन न करणारे तंत्रज्ञान व ऊर्जास्त्रोतांच्या संशोधनासाठी शेकडो कोटी डॉलर खर्च करू इच्छितो. तंत्रज्ञान व पैसा मानवजातीला वाचवू शकणार नाही हे त्याला उमगत नाही. तो समस्येलाच उपाय समजत आहे. ही खास तंत्रज्ञान व यंत्रकेंद्री पाश्‍चात्य मानसिकता आहे. त्यांनी लक्षात घ्यावे की, भौतिक विकास व जीवन एकाचवेळी असू शकणार नाही. गरज 250 वर्षांपूर्वीच्या यंत्र पूर्व ऊर्जाविरहित जीवन पध्दतीकडे जगाने तातडीने जाण्याची आहे.

शेतकर्‍यांनी प्रकल्पांना सरळ विरोध करावा. कारण शेती व निसर्गाधारीत जगणेच मानवजातीला वाचवेल. कार्बनची वाढ थांबवण्यासाठी व असलेला कार्बन शोषणारे हरितद्रव्य वाढण्यासाठी उद्योग, शहरे विसर्जित करणे आवश्यक आहे. त्यांनी व्यापलेली व घेतलेली जमीन ज्यांच्याजवळ शेती नाही त्यांना द्यावी. वाढते तापमान, अवर्षण, अवकाळी, वाळवंटीकरण, वणवे, वादळे, बर्फवृष्टी, अतिवृष्टी, महापूर, समुद्रपातळीतील वाढ, घटते भूजल व सतत वाढत्या दुर्घटना आपल्याला जाणीव करून देत आहेत. हा विकासरूपी मृत्यूचा सापळा मानवजातीने प्रगतीच्या नावे स्वतः लावला आहे. त्यातून बाहेर पडणे व तो मोडणे सर्वस्वी त्याच्या हाती आहे. गरज योग्य आकलनाची व इच्छाशक्तीची आहे.

– अ‍ॅड. गिरीश राऊत
9869023127