जळगाव- आपण स्वत: ला अनेक सीमांमध्ये बंदीस्त केले आहे. खरे तर मानवतावादाला कसलीही सीमा नसतात, आपली जात, धर्म, पंथ गळून पडले पाहिजे, त्यातूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य होईल, असा सूर ‘सर्वधर्म समभाव परिषद’ मध्ये उमटला.
अरूणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता व एऩएस़एस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सर्वधर्म समभाव परिषद’ सोमवारी दुपारी १ वाजता पार पडली़ यावेळी उपस्थित मान्यवर बोलताना हा सूर निघाला़ व्यासपीठावर हिंदू धर्माचे अभ्यासक डॉ.विकास काटदरे, इस्लाम धर्माचे अभ्यासक प्रा़ सोहेल अमिर, ख्रिश्चन धर्माचे फादर जीन्टो, बौध्द धर्माचे भंते प्रज्ञानंदजी व भंते संघरत्नजी हे उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले़ तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.संजय भामरे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करत धर्मांची माहिती दिली़ तोच मनाच्या शुध्दीसाठी ध्यानसाधना करणे आवश्यक असल्याचा सल्ला मान्यवरांनी दिला. काहीवेळेस चूक आपण करतो, पण दोष धर्माला देतो असेही काहींनी सांगितले.
धर्म हा आवश्यक आहे, सोबतच सुंदर विचारांची जोपासना हीच सुध्दा परमेश्वराची उपासना करणे होय असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.जयश्री नेमाडे यांनी सांगितले़ धर्मामुळे शिस्त, नियम, संस्कार घडत असतात, त्यामुळे सर्वानी सलोख्याचे संबंध ठेवावे असेही त्या म्हणाल्या. यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.संजय भामरे, प्रा.वृषाली कोल्हे, प्रा.डॉ.श्रीकांत चौधरी व प्रा.डॉ.प्रकाश कांबळे व प्रा.डॉ.सुगंधा पाटील यांनी परिश्रम घेतले.