मानवतावादी विचारांची पेरणी करा, आदर्श समाजनिर्मिती होईल !

0

जय गणेश फाउंडेशनच्या द्वारकाई व्याख्यानमालेत साहित्यिक माया दामोदर

भुसावळ- भुसावळ परीसराला अनेक साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. म्हणूनच या भूमीला साहित्य, संस्कारांचा सुगंध आहे. महापुरुषांच्या विचारांवर चालणारा समाज प्रगल्भतेकडे वाटचाल करतो. मानवतावादी विचारांची पेरणी केली तर आदर्श समाजाची जडण-घडण होते, असे परखड मत शेगावच्या साहित्यिक माया दामोदर यांनी येथे व्यक्त केले. भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या आठवणी जपण्यासाठी तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. तिचे तृतीय पुष्प सोमवारी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात गुंफण्यात आले. त्यात ‘संस्कार, स्वातंत्र्य आणि जगण्याची दिशा’ हा विषय मांडताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या चिटणीस उषा पाटील होत्या.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
विचार मंचावर अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.डॉ.सुनील नेवे, सुलभा चापोरकर, मुख्याध्यापिका प्राची देसाई, जिल्हा साक्षरता समितीचे सदस्य गणेश फेगडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व्याख्यानमालेचे समन्वयक अरुण मांडळकर यांनी केले. मातेच्या आठवणी वैचारीक चळवळीच्या माध्यमातून जपण्यासाठी नेमाडे यांनी सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात व्यापक होईल. यंदा उपक्रमाचे चौथे वर्ष होते. त्यास मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रमुख वक्त्या माया दामोदर यांना दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांची ‘माय’ कवितेचे भुसावळ येथील नाट्य कलावंत विरेंद्र पाटील यांनी साकारलेले अक्षरचित्र भेट देण्यात आले. त्यातील समारोपाच्या ‘देह जाळत-पोळत ओला अंतरी जिव्हाळा, आसू डोळा जिरवत पिके मायचा गं मळा’ या ओळी अंतर्मनाचा ठाव घेणार्‍या ठरल्या. उपक्रमासाठी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र मांडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

उजेड पेरणारा उपक्रम : प्रा.डॉ.सुनील नेवे
जय गणेश फाउंडेशनचा फिरती व्याख्यानमाला उपक्रम पथदर्शी आहे. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यात जे सातत्य ठेवले ते प्रेरणादायी आहे. नव्या पिढीसमोर विचारांचा उजेड देण्याचा प्रयत्न यातून होत आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशी त्रिवेणी गुंफण करणार्‍या या उपक्रमाचा इतरांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले. समाजाला जे हवं ते देण्याची धडपड या उपक्रमातून दिसते. वैचारीक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न त्यातून होतोय असे, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाच्या चिटणीस उषा पाटील यांनी नमूद केले.

आई जीवनाला देते आकार
संस्कारांचे बाळकडू पाजणार्‍या जन्मदात्यांचा आणि मानवतेचा जागर घराघरात झाला तर प्रगल्भ समाजनिर्मिती होणे शक्य आहे. आई-वडिलांनी पोट खपाटीला घालून जे शिक्षण दिले समाज जडण-घडणीसाठी उपयोगी आणायला हवे, सुसंस्कारीत पिढी घडवते ती आई होय. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी असते. डोळ्यात टचकन पाणी आणणारे नाव म्हणजे जन्मदात्री आई होय. जीवनाला आकार द्या. त्यासाठी आई-वडीलांशी मुक्त संवाद साधा. उच्च शिक्षितांचे जन्मदाते वृद्धाश्रमात पाहून दु:ख होते. आपलं शहर सांस्कृतिक पंढरी होण्यासाठी वैचारीक उपक्रमांचे प्रमाण वाढले पाहिजे, असेही दामोदर यांनी नमूद केले.