नवी दिल्ली – मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. एल्गार परिषदेमध्ये दिलेली भाषणे भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारास कारणीभुत असल्याचा दावा करत महाराष्ट्र पोलिसांनी संबंधितांना अटक केली होती.
संबंधित याचिका इतिहासकार रोमीला थापर, अर्थशास्त्रज्ञ प्रभात पटनाईक, देवकी जैन, समाज शास्त्राचे प्राध्यापक सतीश देशपांडे आणि मानवी हक्क वकील माजा दारूवाला या ५ जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेमध्ये अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या या ५ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी देण्यास नकार देत त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते.