मानसरोवरला जाण्यापासून चीनने भारतीयांना रोखले

0

नवी दिल्ली-कैलास मानसरोवरला तीर्थयात्रेनिमित्त गेलेल्या भाविकांना मानसरोवरात पवित्र स्नानासाठी चिनी अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारल्याचा आरोप काही यात्रेकरुंनी केला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. मात्र, याबाबत चीनकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही. याच महिन्यांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कैलास-मानसरोवर यात्रेसंदर्भात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर चीनने भाविकांसाठी नाथूलाचे मार्ग खुला करण्याला सहमती दर्शवली होती. याची माहिती स्वतः सुषमा स्वराज यांनी दिली होती.


 

सुषमा स्वराज यांची चीनशी चर्चा 

गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या काळात सुमारे ७२ दिवस चाललेल्या डोकलाम वादामुळे चीनकडून कैलास-मानसरोवरची यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी नाथूला पास बंद केला होता. त्यानंतर, याच महिन्यांत सुषमा स्वराज यांनी चीनला सांगितले होते की, जोपर्यंत दोन्ही देशांमधील संबंध तोपर्यंत सुधारणार नाहीत जोपर्यंत दोन्ही देशांच्या नागरिकांतील संबंध सुधारणार नाहीत. गेल्या यात्रेच्या वेळी चीनने नाथूला मार्ग बंद केल्याने भाविकांना धक्का बसला होता. मात्र, चर्चेनंतर हा मार्ग खुला करण्यात आला असून भाविकांसाठी हेल्पलाइन देखील सुरु करण्यात आल्याचे स्वराज यांनी सांगितले होते.

१५८० भाविक करणार यात्रा

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या वर्षी १५८० भाविक कैलास-मानसरोवरची यात्रा करणार आहेत. यामध्ये भाविकांचे ५० चे दहा गट नाथुला मार्ग (सिक्कीम) आणि ६० भाविकांचे अठरा गट पारंपारिक मार्ग लिपुलेख (उत्तराखंड) येथून आपली यात्रा पूर्ण करतील. जूनमध्ये सुरु होणारी कैलास-मानसरोवर यात्रा पुढील चार महिने चालणार आहे. या यात्रेसाठी लकी ड्रॉ काढण्यासाठी भाविकांची वैद्यकीय चाचणी केली जाते. १८ वर्षांपेक्षा अधिक आणि ७० वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्तीच या यात्रेला जाऊ शकतात.