सौंदर्य स्पर्धेत पुनम सिंग यांचा द्वितीय क्रमांक
चिंचवड- शारिरीक व मानसिक आरोग्य वाढविण्यासाठी सर्व वयोगटातील महिलांनी अशा सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो व व्यक्तीमत्व विकसित होते. मला माझ्या मुलाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे मी यशस्वी झाले, असे मत ही पुनम सिंग यांनी व्यक्त केले. 14 जूनला श्रीलंकेतील निगोम्बो शहरात झालेल्या ‘डॅझल मिस अँड मिसेस इंडिया युनिव्हर्स 2018’ या स्पर्धेत चिंचवडमधील रहिवासी पुनम सिंग यांनी द्वितीय क्रमांक (फर्स्ट रनर अप) पटकावला. त्यावेळी ते बोलत होते. नोकरीपेशा स्त्रियांच्या धकाधकीच्या जीवनातही स्वत:चे सौंदर्य राखून देशाबाहेरील सौंदर्य स्पर्धा जिंकण्याची धमक दाखविणार्या पुनम सिंग यांचे शहरात कौतुक होत आहे.
श्रीलंका सरकार पर्यटन महामंडळ आणि परिसा कम्युनिकेशन यांच्यावतीने आयोजित केलेल्या डॅझल सौंदर्य स्पर्धेत भारतातील विविध राज्यातून सव्वीस स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड शहरातील पुनम सिंग यांचा एकमेव सहभाग होता. या स्पर्धेतील एकूण चार फेरींपैकी रॅम्प वॉक, अनुकूलता, मिसेस इंडीया युनिव्हर्स फेरीमध्ये प्रथम क्रमांक आणि क्वीन कॅटेगरीत, व्दितीय क्रमांकासह एकूण स्पर्धेत दुसर्या क्रमांकाचा किताब व मुकुट पुनम सिंग यांनी पटकाविला. म्हैसूर येथील हेमामालिनी लक्ष्मण यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
श्रीलंकेच्या पर्यटन विभागाचे वरिष्ठ सल्लागार फेलिक्स रॉड्रिगो यांच्या हस्ते या सौंदर्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनात तबस्सूम हक यांचा मोलाचा सहभाग होता. सौंदर्य तज्ज्ञ श्रृती पोटोळे क्लॅरन्स, बिया संधू तनेजा, अनुजा पांडे, हेमलता अशोक पाटील, स्वाती गोस्वामी, प्रसांत घोष, पायल प्रामाणिक, श्वेता वरपे यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले.