पुणे : केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वार्यांची (मान्सून) तब्बल आठवडाभर रेंगाळलेली वाटचाल सुरू झाली आहे. मंगळवारी (दि. 6) मान्सूनने केरळचा बहुतांशी भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग व्यापाला असून, महाराष्ट्राच्या दिशेने कूच केली होती. बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘मोरा’ चक्रीवादळामुळे मान्सून सर्वसाधारण वेळेच्या दोन दिवसआधीच केरळात दाखल झाला होता. याबाबतचा हवामान विभागाचा अंदाज दहा वर्षांनंतर प्रथमच अचूक ठरला. मात्र ‘मोरा’ वादळ निवळल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल मंदावली, आणि मान्सून केरळातच रेंगाळला होता.
वाटचालीस मिळाली गती
मंगळवारी (दि. 6) अरबी समुद्राच्या पश्चिममध्ये भागामध्ये हवेचा ठळक कमीदाबचे क्षेत्र तयार झाल्यानंतर मान्सूनच्या वाटचालीस पुन्हा गती मिळाली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासांमध्ये ओमानच्या दिशेने सरकण्याचे संकेत आहेत. दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मान्सून वार्यांनी प्रगती केली आहे. केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगतच्या समुद्रात ढग गोळा झाले आहेत. पुढील दोन दिवसांत मान्सून आणखी काही भागात दाखल होण्यास पोषक वातावरण आहे.