मुंबई । गेल्या महिनाभर कुठे ना कुठे आकस्मिकपणे हजेरी लावणार्या पावसाने व गारपीटीने विविध पीकांचे नुकसान केले असून शुक्रवारी सायंकाळनंतर नवी मुंबई, रायगड भागात वीजेच्या लपंडावासह पावसाने हजेरी लावली. याकाळात नागरीक नि विशेषत: चाकरमान्यांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळीचा फटका काही ठिकाणी तीव्र स्वरुपात जाणवला असून सांगली जिल्ह्यातील वडगाव येथे साडेचारच्या सुमारास वीज पडून शंकर कोंडी पाटील (60) आणि अरविंंद राजाराम बिसले (45) हे शेतमजूर मृत्युमुखी पडले.
साईभक्तांचीही पावसामुळे धावपळ
नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या साईभक्तांचीही पावसामुळे धावपळ झाली. रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्गला वादळाचा तडाखा बसला. घोटगे-परमे पंचक्रोशीत हजारो केळीची झाडे जमीनदोस्त झाली. चंद्रपूर जिल्ह्यातही शनिवारी जोरदार पाऊस झाला. बीडमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वळवाच्या पावसाने हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागांत विजांसह पाऊस पडला. दरम्यान, रविवारी (दि.15)आणि 16 मे रोजी पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
खोपोलीत शनिवारी सकाळी 8 वा. अवकाळी पावसाने धो धो बरसत खोपोली करांना चांगलेच झोडपुन काढले. सकाळी पडलेल्या पावसाने विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. शुक्रवारी रात्री 8 वा. पडलेल्या पावसा बरोबरच विजेचा लखलखाट हि अनुभवास मिळाला. वादळी पावसाने महामार्गालगत असणारी जाहिरात फलके कोसळून जमिनीवर पडली. तर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी सकाळी 6 वा. पासून सुवर्ण तास असल्याने द्रुतगती महामार्ग अवजड वाहनांना प्रवेश बंदी असल्याने व सुटीचा वर असल्याने बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ व सावरोली टोळ नाक्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.