पहूर, ता.जामनेर। येथून जवळील लोंढ्री तांडा आणि शेंगोळा येथे कापूस व्यापार्यांनी मापात पाप करून 150 क्विंटल मागे 25 ते 30 क्विंटल कापूस चोरून शेतकर्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेतकर्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे व्यापार्यांचे पितळ उघडे पडले आहे. फसवणुकीत ज्ञानेश्वर सोना राठोड, शेषमल राठोड, आत्माराम राठोड, प्रकाश जाधव आदी शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्टेशनला दोन्ही कापूस गाड्या जमा झाल्या आहेत. तसेच व्यापार्यांनाही चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटांशी संघर्ष करत शेतकरी कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच कापूस मोजणी करत असताना मापात पाप करून शेतकर्यांची लूट करणार्या व्यापार्यांवर ठोस कारवाईची मागणी संतप्त शेतकर्यांनी केली आहे.
सविस्तर असे, पहूर येथून जवळील लोंढ्री तांडा आणि शेंगोळा येथे धुळे येथील काही व्यापारी कापूस खरेदी करण्यासाठी आले होते. जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथे काही शेतकर्यांचा कापूस खरेदी करून व्यापारी पहूर जवळील लोंढ्री येथे आले. लोंढ्री तांडा येथे कापूस मोजला जात असताना दर तोल मागे 9 ते 10 किलो अशाप्रकारे क्विंटल मागे साधारण पंचवीस किलो कापूस शेतकर्यांचा कमी मोजला जात होता. मापात पाप होत असल्याची ही बाब लोंढ्री तांडा येथील शेतकरी नामदेव राठोड यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच यासंदर्भात पोलीस पाटील पती डॉ.सुभाष चिकटे यांना माहिती दिली. आपले पितळ उघडे पडले असल्याची खात्री होताच व्यापार्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक रहिवाशांनी त्यांना एका घरात कोंडून ठेवले. नामदेव राठोड यांनी पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी आपल्या सहकार्यांसमवेत धाव घेतली. त्यांनी संबंधित व्यापार्यांना त्यांच्या गाड्यांसह ताब्यात घेऊन चौकशी कामी पहूर पोलीस स्टेशनला आणले.