माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन द्या!

0

शिवसेना शहर संघटिका उबाळे यांची मागणी

पिंपरी :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील झोपडपट्टीतील मुली, महिलांना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याची मागणी, शिवसेनेच्या शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी पालिकेकडे केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ’सॅनिटरी नॅपकिन’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, त्याची उपलब्धता आणि किमतींमुळे ते झोपडपट्टीतील कुटुंबातील महिलांच्या आवाक्याबाहेर आहेत. महापालिकेच्या हद्दीत जवळपास 65 ते 70 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये अंदाजे एक लाखाच्या आसपास मुली, महिलांचे वास्तव आहे. या महिलांची आर्थिक परस्थिती अत्यंत कमकुवत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

त्यामुळे महापालिकेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील झोपडपट्टीतील मुली, महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना माफक दरात सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक झोपडपट्टीत एक सॅनेटरी नॅपकीन व डिस्पोजल मशिन बसविण्यात यावे, अशी मागणी उबाळे यांनी केली आहे.