मावळ तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून आहे लौकिक
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील अग्रगण्य मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेस पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या शताब्दीपुर्ती निमित्ताने ‘शरद पवार सहकार गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात पतसंस्थेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
बँकेतर्फे पतसंस्था गटातून मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेस राज्याचे सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री गिरीष बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पतसंस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, उपाध्यक्ष रोहिदास गाडे तसेच सर्व संचालक मंडळाने सदर पुरस्कार स्वीकारला.
वार्षिक उलाढाल 200 कोटी
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था ही मावळ तालुक्यातील एक अग्रगण्य पतसंस्था असून, या पतसंस्थेची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपयांच्या घरात आहे. पतसंस्थेचे तळेगाव येथे मुख्य कार्यालय असून, कामशेत व देहूरोड येथे शाखा आहेत. पतसंस्थेची सभासद संख्या 2 हजार 460 असून, भागभांडवल 2 कोटी 75 लाख रुपये आहे. ठेवी 30 कोटी 25 लाख रुपये असून, कर्ज वाटप 28 कोटी 65 लाख आहे.