मायादेवी नगरात शासकीय अधिकार्‍यांची घरे फोडली

0

जळगाव- शहरातील शाम नगरात रविवारी सव्वा लाखांच्या घरफोडीची घटना ताजी असताना दुसर्‍याच दिवशी सोमवारी सकाळी मायादेवी नगरात शासकीय अधिकार्‍यांची घरे फोडल्याचे समोर आले आहे. यात एका घरातून चोरट्यांना दीड तोळे सोन्याचे दागिने हाती लागले. तर दुसर्‍या घरातून काही न मिळाल्याने चोरट्यांचा प्रयत्न असफल ठरल्याची माहिती मिळाली आहे. नवीन वर्षाची सुरवातच घरफोड्यांनी झाली असून सत्र सुरुच आहे. भरदिवसा रेकी करुन, यानंतर पोलीस गस्तीच्यां वेळेत चोर्‍या करुन चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे.

मायादेवी नगरातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता एस.व्ही.चौधरी हे पत्नीसह नाशिक येथील मुलाकडे गेले आहेत. यादरम्यान त्यांचे मागच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. याबाबत शेजारच्यांनी त्यांना फोनवर माहिती दिली. घरात काही रक्कम व अथवा मौल्यवान वस्तूचे नव्हती असे त्यांनी सांगितले. तर दुसर्‍या घटनेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागातील दिलीप रामदास झोपे हे पत्नी, मुलांसह हैद्राबाद येथे फिरायला गेले आहेत. त्यांचेही बंद घराचे कुलूप कटरने कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या मागील भाडेकरुच्या घराला बाहेरुन कडी लावली. घरातून एक ते दीड तोळे सोन्याचे दागिने लांबविले असल्याची माहिती मिळाली आहे.