मायानगरीला सलाम आमचा!

1

खान्देशातून समाजवादी विचारांचा वारसा घेऊन ‘जनशक्ति’ने मुंबईच्या महानगरात एका वर्षापूर्वी पाय ठेवले. सिद्धीविनायकाच्या चरणी पहिला अंक ठेवून मुंबानगरीत पाय रोवले. पत्रकारितेची समृद्ध परंपरा असलेल्या मुंबईत एक वर्षपूर्तीचा मनस्वी आनंद आहे. इथे दाखल झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सिद्धीविनायकाच्या आशीर्वादाने जनशक्ति दैनिकाने आपले वेगळेपण व स्वतंत्र अस्तित्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. मुंबईतील पारंपारिक पत्रकारिता आणि त्याला खान्देशी झणझणीत स्वादाचा पुरेपूर आनंद या वर्षभरात मुंबईतील वाचकांना देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यातून किती आनंद मिळाला आणि आम्ही कितपत यशस्वी ठरलो याची पावती आम्हाला वाचकांकडून वेळोवेळी मिळाली देखील. मुंबई जागतिक कीर्तीचे शहर. जगातील अनेक देशांना या शहराने भुरळ घातली आहे. याचे कारणही तसेच आहे.

राज्यासह देशाचे राजकारण असो, समाजकारण असो अथवा अर्थकारण असो, या सर्वांच्या पुर्ततेत या मायानगरीचा मोलाचा वाटा असतो. आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणारी ही नगरी कुणालाही उपाशी ठेवत नाही हे विशेष. बॉलिवूडचे जाळे असो अथवा उद्योगांच्या महत्वाच्या घडामोडी मुंबानगरीत सातत्याने समृद्ध होताना दिसून येतेय. गेल्या काही वर्षांत मुंबईचा अफाट विस्तार झाला आहे, त्यात सातत्याने भरच पडत आहे. मराठीसह अमराठी बांधवांनी मुंबईला मजबूत करण्यास मोलाचे योगदान दिले आहे. अशा या महानगराच्या कुशीत आम्ही खान्देशातून येऊन जागा केली. आम्हाला आमची कर्तबगारी दाखवण्याची संधी दिली. खरतर हे एक आव्हानच होतं. गेल्या दोन दशकात ग्रामीण महाराष्ट्र व अन्य प्रांतातील वर्तमानपत्रांनी जसा आपला ठसा उमटविला आहे. त्याचप्रमाणे जळगावच्या जनशक्तिने आपला मूळ चेहरा कायम ठेवून आणि वेगळा विचार घेऊन मुंबईकर होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आम्ही जळगाव, धुळे, नंदुरबार नंतर सांस्कृतिक नगरी पुण्यात वाचकांचा विश्वास प्राप्त केला. या विश्वासाच्या बळावर आम्हाला मुंबईत स्थान शोधताना अजिबात भय वाटले नाही. मुंबईने आणि मुंबईकर वाचकांनी आम्हाला मायेचा पाझर दिल्यानेच आम्ही खान्देशातून व्हाया पुणे, मुंबईत पाय रोवण्याचा प्रयत्न केला, यामध्ये वाचकांच्या प्रेमाने आम्ही यशस्वी ठरलो. इथे आधीच प्रस्थापित असलेली वर्तमानपत्रे आणि माध्यमांच्या सान्निध्यात आम्हालाही मुंबईकरांनी सामावून घेतले आहे. म्हणूनच आज पहिल्या वर्धापन दिनाचा आनंद तुमच्यासोबत साजरा करताना हर्ष होत आहे. महाराष्ट्राला समृद्ध इतिहासाचा वारसा आहे. याच समृद्ध वारशाला ‘समृद्ध महाराष्ट्र’ या विशेष पुरवणीच्या रूपाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या हाती देत आहोत. आपले प्रेम कायम राहो, या अपेक्षेसह…! दैनिक जनशक्तिच्या सर्व सहकार्‍यांचा, वाचकांचा, जाहिरातदारांचा मी आभारी आहे.

 

– कुंदन ढाके 
मुख्य संपादक