मायावतींच्या बहुजन समाज पक्षात जाऊ शकतो – जिग्नेश मेवाणी

0

जालंधर : गुजरातमधील अपक्ष आमदार व युवा दलित नेता जिग्नेश मेवाणी यांनी आपण मायावती यांच्या बहुजन समाज पक्षात जाऊ शकतो, असे सांगत आपली राजकारणाची आगामी दिशा स्पष्ट केली आहे. मेवाणी सध्या पंजाब राज्याच्या दौ-यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

जिग्नेश मेवाणी म्हणाले, सध्या कोणत्याही राजकीय पक्षाशी आपले मत जुळून येत नाही. मात्र, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षात काम करण्याची आपली तयारी आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांनी आपल्याला निमंत्रण दिल्यास बसपात प्रवेश करू शकतो असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दलितांवरील अन्याय, समस्या व प्रश्नांबाबत आपण देशभर फिरणार असून यापुढे प्रत्येक महिन्याला पंजाबमध्ये राजकीय दौरा करणार आहे. भाजपवर टीका करताना मेवाणी म्हणाले, भाजपचे अनेक नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे संविधानाला बदलवण्याची भाषा करणा-यांनाच आता बदलणे गरजेचे आहे असे मेवाणी यांनी म्हंटले. काँग्रेस पक्षाचे नाव घेता मेवाणी म्हणाले, देशावर राज्य करणा-या इतर काही पक्षांनी अनेक वाईट कामे केली. मात्र त्यांनी संविधान जिवंत ठेवले असेही मेवानी यांनी सांगितले.