जळगाव। पत्नीसह सासर्याला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून 8 जणांना शिक्षा सुनावून दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथील माहेर व सासर असलेल्या भारती योगेश पाटील यांना पती योगेश व सासु मिराबाई यांनी माहेरी येवून शिविगाळ करीत मारहाण केली होती.यावेळी गणेश गंजीधर पाटील, सुरेश गंजीधर पाटील, ईश्वर सुखदेव पाटील,समाधान ईश्वर पाटील, समाधान भगवान पाटील व दिपक नवल पाटील यांनी लाठया काठयांनी भारतीचे काका गुलाब पाटील, भाऊ भुषण पाटील व काका धर्मराज पाटील यांना मारहाण केली होती.
10 साक्षीदार तपासले…
यावेळी भारतीबाई यांच्या सासु मिराबाई यांनी तिला धरून ठेवून पती योगेश याने जबरदस्तीने तिला विषारी औषण पाजले होते. ही घटना 14 सष्टेंबर 2011 रोजी घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलिसात भारती पाटील यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 307, 498, 143,147,148,149 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्या.अग्रवाल यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी योगेश पाटील याला भादवी कलम 323 प्रमाणे दोषी ठरविले. न्यायालयाने आरोपी योगेश याला कलम 324 प्रमाणे 6 महिने, 323,143,147 प्रमाणे प्रत्येकी 1 महिना शिक्षा सुनावली आहे. योगेश पाटील यांची आई मिराबाई यांना कलम 324, 143,147 प्रमाणे प्रत्येकी 1 महिना शिक्षा दिली आहे. तसेच आरोपी गणेश पाटील, सुरेश पाटील, समाधान ईश्वर पाटील, समाधान भगवान पाटील यांना कलम 324 प्रमाणे 10 दिवस शिक्षा तर कलम 147,147, प्रमाणे प्रत्येकी 500 रुपये दंड तर आरोपी ईश्वर पाटील व दिपक पाटील यांना कलम 324 प्रमाणे प्रत्येकी 1 हजार रुपये दंड व कलम 143,147 खाली प्रत्येकी 500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले. या मारहाणीच्या गुन्हात सरकारपक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले.