मारहाण करणार्‍या तिघांना प्रत्येकी 5 हजार दंड

0

नंदुरबार : अंगणात साचलेले पावसाचे पाणी झाडल्याच्या क्षुल्लक कारणावरून शेजार्‍यास मारहाण करणार्‍या तिघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे यांनी ही शिक्षा ठोठावली.

शहादा येथे 2 जून 2013 रोजी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास दिलीप संभू साळवे हे अंगणात साचलेले पावसाचे पाणी झाडत होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणार्‍या नर्मदाबाई वाघ या महिलेने त्यांना शिवीगाळ केली. तसेच ब्रिजलाल धनजी वाघ व विनोद धनाजी वाघ यांनी काठीने दिलीप साळवे यांना मारले. या घटनेत जखमी झालेल्या साळवे यांना रुग्णालयात करण्यात आले.तसेच तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पो.हे.काँ. शिवाजी झेंडा पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्यात अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील गणेश बागुल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. आर. शेंडगे यांनी तिन्ही आरोपींना एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या प्रतिज्ञापत्रावर व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.