मारहाण व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी 2 वर्षे शिक्षा

0

जळगाव । मांगीर बाबा यांच्या यात्रेनिमित्त आयोजिन लावण्यांच्या कार्यक्रमातून पाणी पिण्यासाठी जात असलेल्या भिमराव अशोक शिंदे यांना दहा जणांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणाचा खटला न्यायाधीश चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यावर आज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकारे यांनी निकाल देत त्या दहाही आरोपींना 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

यांनी केली होती शिंदे यांना मारहाण
मांगीर बाबा यात्रेनिमित्त 11 मे 2013 रोजी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमात जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे स्पीकरवर सुरू असतांना भिमराव अशोक शिंदे हे पाणी पिण्यासाठी कार्यक्रमातून उठून गेले असता त्यांना छोटू महारू पाटील, महेश गोविंदा पाटील, नामदेव आनंदराव पाटील, ज्ञानेश्‍वर मधुकर पाटील, राहूल आनंदा पाटील, किशोर राधो पाटील, प्रमोद रमशे पाटील, भगवान नामदेव पाटील, दिपक प्रकाश पाटील, समाधान गोरख पाटील (सर्व रा. दोनगाव, ता. धरणगांव) यांनी बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली होती.

धरणगाव पोलिसात गुन्हा
याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात भिमराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणार्‍या या दहाही जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होवून न्यायाधीश चित्रा हंकोर यांच्या न्यायालयात खटला सुरू झाला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले.

अशी सुनावली शिक्षा
मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आज बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रा हंकोर यांनी निकला दिला. त्यात त्यांनी मारहाण व शिवीगाळ करणार्‍या दहाही आरोपींना दोषी धरून अनुसूचित जाती व जमाती व प्रजाती कलम 3 अन्वये 2 वर्षे कारावास व 2 हजार रुपयांचा दंड तसेच भादवि कलम 504 अन्वये 6 महिने कारावास व 2 हजार रुपयांचा दंड तर भादवि कलम 143,147, अन्वये 6 महिने कैद व 1 हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्र भोगावयाची आहे. त्यामुळे आरोपींना एकूण 2 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. चारूलता बोरसे यांनी कामकाज पाहिले तर आरोपीपक्षातर्फे जी.एस.पाटील यांनी कामकाज पाहिले.