मारुळ मध्ये एकाच रात्री ग्रामपंचायतीच्या 14 एकर जमिनीवर सुज्ञ नागरिकांचा ताबा

0

पोलिस येताच काढले अतिक्रमण; गावातील वातावरण तापले

फैजपूर- गावातील अज्ञात माथेफिरूने सार्वजनिक फलकावर लिहिलेल्या एका चुकीच्या संदेश वजा सूचने मुळे ‘मारूळ’ तालुका यावल गावातील सुज्ञ ग्रामस्थांनी तब्बल 14 एकर एकूण क्षेत्र 4.87 हेक्टर आर या ग्रामपंचायतीच्या शेत जमिनीवर एका दिवसात खुणा गाडून आपला हक्क दाखवत अतिक्रमण केल्याची घटना 1 रोजीच्या सकाळी घडली व गावात एकच खळबळ उडाली मात्र ग्रामपंचायत व पोलिसांच्या मदतीने ज्या गतीने अतिक्रमण झाले त्याच गतीने ते काढून टाकण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. मारूळ गावाच्या लगत ग्रामपंचायतीचे 14 एकर शेत आहे ते तीन वर्षासाठी कराराने देण्यात आले आहे मात्र या वर्षी पाऊस कमी झाल्याने शेत रीकामे होते याचा फायदा घेत एका अज्ञात सुशिक्षित माथेफिरूने मारुळ गावाच्या सार्वजनिक फलकावर उर्दूमध्ये एक संदेश लिहिला व त्याचा आशय असा होता की, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी ठराव करून ग्रामपंचायत मालकीची शेत जमिनीवर प्लॉट पडणार आहे. ग्रामस्थांनी जागा ताब्यात घ्यावी असा संदेश वजा सुचना 31 ऑक्टोबर च्या रात्री लिहिली होती दिनांक 1 उजाडताच ग्रामस्थांनी फलकावरील सूचना वाचून थेट शेत जमिनीकडे धूम ठोकली ज्याने त्याने आपापल्या परीने खुणा गाडल्या त्यानंतर चुन्याने लाईन आऊट करून जागेवर आपला हक्क दाखवायला सुरवात केली त्यात गरजू कमी व श्रीमंतांचा जास्त भरणा होता यावेळी शेत जमिनीवर जत्राच भरली होती प्रत्येक खुणे जवळ एक व्यक्ती अशा प्रकारे पूर्ण जमिनीवर एक प्रकारे लेआउट अस टाकण्यात आले होते. या घटनेची माहिती सकाळी दहा वाजता ग्रामपंचायतीला मिळतात तेही गोंधळले त्यांनी गावात दवंडी पिटवली व असा कुठलाच ठराव झालेला नाही अतिक्रमण व खुणा तातडीने काढून घ्यावे त्यानंतर काहींनी जमीन मोकळी केली मात्र काहींनी खुणा तशाच ठेवल्या शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले हेड. कॉन्स्टेबल उमेश पाटील व सहकार्‍यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितला त्या नंतर पूर्ण शेत जमीन रिकामी करण्यात आली व पुढील अनर्थ टळला या प्रकरणी सरपंच उषाबाई गावळे यांनी पोलिस व वरिष्ठ अधिकार्‍यांना झाल्या घटनेबाबत निवेदनाव्दारे माहिती दिली आहे

ग्रामपंचायतीचा तसा ठराव नाहीच
ग्रामपंचायतीचा अथवा मासिक सभेत आम्ही असा कुठलाच ठराव केलेला नाही. सदरची शेत जमीन कराराने दिलेली आहे. मारूळ हे गाव शांत आहे तर ते अशांत करण्याचा प्रयत्न अज्ञात माणसाने केला आहे. त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा व ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सरपंच उषाबाई गावळे म्हणाल्या.