मार्केटयार्डातील वाहतुकीचे चित्र बदलणार : देशमुख

0

पुणे । मार्केट यार्डातील वाहतूक समस्या, ड्रेनेज, इलेक्ट्रीक सुविधा आदींचे फेरमुल्यांकन करून त्याचा रोडमॅप तयार करणार असून नव्याने काही उपाययोजना करून आठवडयाभरात मार्केटयार्डातील वाहतुकीचे चित्र बदलणार असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सचिव बी.जे. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. रविवारी बाजार समितीचे सचिव बी.जे. देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बाजार समितीचे उपमुख्यप्रशासक भूषण तुपे, तसेच प्रसासकीय सदस्य उपस्थित होते.

फेरमूल्यांकन करून योजना
देशमुख म्हणाले, मार्केटयार्डात 2005 साली वाहतूक, पार्कींग, ड्रेनेज, लाईटचे अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते त्यामुळे शेतकर्‍यांना मालाची ने-आण करण्यास अडचण निर्मान होत होती. त्याचा बाजारावर देखील परिनाम होत होता. त्यामुळे आडते, तोलणारे, टॅम्पो वाहतुकदार, हमाल या सर्वांची मिटींग घेऊन सुकाणु समिती नेमली आणि ह्या सर्व समस्या सोडविल्या याला आता 12 ते 13 वर्षाचा काळ लोटला आहे दरम्यान मार्केटयार्डात गर्दी वाढली, गाडया वाढल्या तसेच लोकांची वर्दळ देखील वाढली असून याचे फेरमूल्यांकन करून नव्याने उपाययोजना कऱणार आहे.

व्यवस्थापनाशी बोलून मार्ग
माझ्या पूर्वीच्या कालखंडात मार्केट यार्डात एकही अनधिकृत टपरी नव्हती. तसेच भुसार मार्केट मधील रस्ता देखील 22 फुट रूंद केले होते. आता नव्याने सर्व पाहणी करून काही अडचण निर्माण होत असेल तर व्यवस्थापनाशी बोलून लवकरच यावर मार्ग काढणार आहे असे यावेळी देशमुख म्हणाले.

पुनर्विकास प्रकल्पाची गरज
नवीन प्रशासक मंडळाने मार्केटयार्डाच्या पुनर्विकास प्रकल्प करण्याचे ठरविले आहे. सध्या मार्केट यार्डाची इमारत कुमकुवत झाली असुन स्ट्रक्चरल ऑडीट मध्ये देखील त्याचे बांधकाम कालबाह्य झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पुढील काळात कोणती जिवितहानी होऊ नये याची काळजी घेणे देखील गरजेचे असून नवीन इमारतीचा विचार करणे गरजेचते आहे असे देशमुख यावेळी म्हणाले.