मार्केट सील झाल्याने व्यापार्‍यांमध्ये गोंधळ

0

जळगाव। गोलाणी मार्केट व परिसरात स्वच्छता नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाल असल्याची तक्रार उपविभागीय दंडाधिकारी जलाला शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती. यादरम्यान, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी शुनिवारी सकाळी गोलाणी संकुल व परिसरात भेट देऊन स्वच्छतेची पहाणी केली.

या पहाणीत श्री. निंबाळकर यांना गोलीणीत सर्वत्र घाण, स्वच्छता आढळून आली होती. यानंतर शनिवारी रात्री 19 जुलै पर्यंत गोलाणी मार्केट मधील सर्व गाळे बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी जलाल शर्मा यांनी दिलेत. यानुसार मनपा कर्मचार्‍यांनी रात्रीच सर्व 1100 गाळेधारकांसाठी नोटीस बजावण्याची पूर्ण तयारी केली. गोलाणी मार्केटच्या प्रवेशद्वारांवर तसेच गाळ्यांवर 19 जुलैपर्यंत मार्केट बंद राहील या आदेशाचे बोर्ड लावण्यात आले होते.

व्यापार्‍यांमध्ये आनंद…
गाळे सील करण्याचे संध्याकाळीच आदेश प्राप्त झाल्याने महानगर पालिका प्रशासनाने नोटीस लावण्याची सुरूवात रात्रीच केली होती. परंतु, काही दुकान गाळ्यांवर नोटीस लावण्याचे काम अपूर्णच होते. हे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महानगर पालिकेचे कर्मचारी देखील गोलाणी मार्केटमध्ये दाखल झाले होते. एकीकडे व्यापारी सभा घेऊन आलेल्या संकटातून मार्ग काढण्याच्या मागे लागलेले असतांना महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून नोटीस लावण्याचे काम सुरूच होते. यावेळी व्यापारी आपला व्यवसाय सलग चार दिवस बंद राहिल्याने नुकासनीच्या चिंतेत फिरत होता. व्यापारी काय निर्णय झाला आहे याची खात्री पदाधिकार्‍यांकडून करून घेतांना दिसत होते. दरम्यान, पदाधिकार्‍यांनी महापौर, आयुक्त यांची भेट घेवून आपले मत मांडल्यावर आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी अटी व शर्तींवर त्यांना तात्काळ गाळे उघडण्याचे आदेश दिलेत. या आदेशानंतर व्यापार्‍यांमध्ये समाधान व आनंद दिसून आला. तसेच जिल्हाधिकार्‍यांनी ठरविल्याप्रमाणे स्वच्छतेचा ठेका देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. स्वच्छतेचा ठेका दिल्याने गोलाणीतील कचरा, घाण, अस्वच्छता नष्ट होण्यास मदत होणार आहे. मार्केटच्या गच्चीवर जाणार्‍या जिन्यास कुलूप लावून बंद करण्यात येणार आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
रविवारी सकाळी मार्केटमधील व्यापारी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना प्रवेशद्वारावर तसेच दुकानांवर 19 जुलैपर्यंत मार्केट बंद राहील अशी नोटीस डकवलेली दिसली. तसेच मार्केटमध्ये पोलसी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मार्केटमध्ये पोलीस बंदोबस्त बघून व्यापार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या निर्णयाचा परिणाम म्हणून व्यापार्‍यांकडून कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी एक दंगा नियंत्रण पथकाची गाडी व शहर पोलीस स्थानकांचे कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते. पोलीस बंदोबस्त व नोटीस बघताच व्यापार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले. यातून व्यापारी एक एक करत जमू लागले. व्यापारी जमल्यानंतर गटा गटात उभे राहून चिंता व्यक्त करत मनपा प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करत होते. यातच कोणीतरी सांगितले की, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे पुढील प्रवेशद्वारा जवळ आले आहेत. हे कळताच या घोळक्याने तीकडे कुच केली. मात्र, ही अफवाच असल्याचे गर्दींच्या लक्षात आल्याने गर्दी पुन्हा मुळ जागी पतर आली.

गर्दीचे रूपांतर सभेत
यानंतर गर्दींचे रूपांतर सभेत झाले. या सभेत व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष सुभाष कासट, उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, सचिव रामजी सुर्यवंशी, दर्जी फाउंडेशनचे गोपाल दर्जी, शिवसेनेच्या मंगला बारी, अनिल छाजेड, सचिन छाजेड, एस.के.लालसह आदी उपस्थित होते. या सभेत मार्केटमधील अस्वच्छतेसह इतर समस्यांचा पाढा वाचण्यात आला. तसेच लोकसहभागातून गोलाणीची सफाई करण्याची सूचना मांडण्यात आली. तर काहींनी महापालिका 2008 पर्यंत सेवा देत असतांना 2014 पासून स्वच्छता व्यापार्‍यांनी करावी असे सांगितले जात असल्याने नाराजी व्यक्त केली.

प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर यांनी गाळेधारकांनी सोसायटी स्थापनकरून स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले असल्याने व्यापार्‍यांना ते शक्य नसल्याचा सूर उमटला. हवे तर महानगर पालिकेने स्वच्छता करून व्यापार्‍यांकडून वर्षाकाठी किंवा महिन्याला बिल वसूल करावी अशी कल्पना मांडण्यात आली. व्यापार्‍यांना चार दिवस दुकान बंद ठेवणे शक्य नसल्याचा सूर चर्चेत उमटला. यानंतर या व्यापार्‍यांनी आपली समस्या घेवून जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना भेटून निवेदन देण्याचे ठरविले.