पिंपरी चिंचवड : ठाणे जिल्ह्यातील गोपाळपाडा ता. शहापूर या आदिवासी पाड्यावर संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि हिंदू सेवा संघ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिलांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेचे औचित्य साधून हळदी – कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात २७१ महिलांना वान म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी १६७ मुलींना ड्रेसचे वाटप केले तर १०० पुरुषांना पँट शर्टचे वाटप केले. त्यासोबतच ३५ लहान मुला मुलींना कपडे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमातच आदिवासी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात १९५ महिलांची तपासणी डॉ. मृणाल फोंडेकर आणि डॉ. नीरज पाटील यांनी करून औषधांचे वाटप केले. औषधांसाठी लक्ष्मी मेडिकल चिंचवड, सप्तश्रुंगी मेडिकल काळेवाडी, राहुल मेडिकल प्राधिकरण, पाटील मेडिकल बिजलीनगर, सुश्रुत आयुर्वेद चिंचवड यांनी मदत केली होती. या सर्व उपक्रमाचे संयोजन डॉ. मोहन गायकवाड आणि श्रीमती पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुनीताताई गायकवाड, जिजाबाई लोंढे, अभिजित लोंढे, रमेश भिसे,राहुल पाटील, सुरेखा पाटील, सोमराज चव्हाण, अनुष्का कराळे यांनी केले होते.