कर्जतजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतूक विस्कळीत ; प्रवाशांना मनस्ताप
भुसावळ- कर्जत जवळील ठाकूरवाडी स्थानकाजवळ मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे अपघातामुळे रविवारी रात्री भुसावळ-पुणे धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस केवळ नाशिकपर्यंत चालवण्यात आली तर सोमवारी सकाळी सात वाजता सुटणारी भुसावळ-मुंबई पॅसेंजरदेखील नाशिकपर्यंत चालवण्यात आली तसेच मनमाड-एलटीटी दरम्यान धावणारी गोदावरी एक्स्प्रेसदेखील ईगतपुरीपर्यंत चालवण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागला.
मालगाडी घसरल्याने वाहतूक ठप्प
कर्जत व लोणावळादरम्यान असलेल्या ठाकुरवाडी घाट परीसरात सोमवारी पहाटे रुळावरून मालगाडी घसरल्याने पुणे ते मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. भुसावळ विभागातील प्रवाशांना या अपघातामुळे मोठा मनस्ताप सोसावा लागला. रविवारी रात्री पुण्याकडे निघालेल्या हुतात्मा एक्स्प्रेस पहाटेच्या सुमारास नाशिक स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले तर सोमवारी सकाळी अप मुंबई पॅसेंजरदेखील नाशिक स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली तसेच मनमाड येथून एलटीटीपर्यंत धावणारी गोदावरी एक्स्प्रेसदेखील ईगतपुरीपर्यंत चालवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. खाजगी बसेसला मात्र यामुळे गर्दी वाढल्याचे चित्र होते.