शहापूर । ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशामुळे नागरिकांच्या वडिलोपार्जित जमिनीच्या व मालमत्तेच्या वाटपावरून कुटुंबातील वाद आता तहसीलदार मिटवणार आहेत. त्यांची नोंद सातबारा उतार्यावर घेतली जाणार आहे. त्यामुळे मालमतेचे वाटप सुलभ होणार आहे. याबाबत शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी सांगितले की, कुटुंबातील स्थावर मालमत्तेचे सहमतीने वाटप अथवा विभाजनासाठी अर्ज केल्यास तहसीलदार त्याची दखल घेऊन सातबारा उतारावर नोंद करणार आहे. त्यामुळे वडिलोपार्जित मालमतेचे वाटप रजिस्ट्रार किंवा न्यायालयात जाण्याची गरज राहणार नसल्याचेही सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद आता संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. तसेच कायद्याच्या तरतुदींची प्रभावीपणे अमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ निरीक्षक यांची कार्यशाळा घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
कार्यशाळा घेणार
महाराष्ट्र जमिनी महसूल संहितेमध्ये कलम 85 मध्ये धारण जमिनीच्या विभाजनाबाबत व अधिकार तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. सध्या पुरेशी कल्पना नसल्याने वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपात अनेक अडचणी येतात. परिणामी लाखो प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच कायद्याच्या तरतुदींची प्रभावीपणे अमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ निरीक्षक यांची कार्यशाळा घेणार आहेत.ह्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपाबाबत तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा. ह्या अर्जावर सर्व वारसांच्या सह्या असणे आवश्यक असून त्याची दखल तहसीलदार घेऊन वाटपाचे आदेश काढतील. आणि त्यांची नोंद मंडळ अधिकारी घेऊन स्वतंत्र सातबारा उतारा तयार करतील. त्यासाठी नोटीस काढण्याची आवश्यकता नसल्याचेही सांगण्यात आले आहे.