जळगाव । शहरातील पिंप्राळा रस्त्यावरील भोईटेनगर रेल्वे गेटाला शनिवारी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास माल वाहतुक अॅपे रिक्षाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यातच अर्धा ते पावून दुरूस्तीचे काम चालल्याने दोन्ही बाजूंची वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या संबधित अधिकार्यांनी त्या ठिकाणी धाव घेत वाकले गेलेले गेटच्या दुरूस्तीचे काम पुर्ण केले. दरम्यान, रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाच्या धडकेत मात्र गेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या आधीही घडल्या होत्या घटना
रेल्वे विभागातर्फे नुकतेच स्वयंचलित रेल्वे गेट बसविण्यात आले आहे. परंतू, दोन ते तीन वेळेस वाहनांच्या धडकेत हे गेट तुटल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच शनिवारी देखील रिक्षाच्या धडकेत भाईटेनगर रेल्वेगेट पुन्हा तुटले. याबाबत असे की, पिंप्राळा-हुडको येथील रिक्षाचालक शेख ताहिर शेख करीम हे आपल्या मालवाहतुक अॅपे रिक्षातून (क्रं.एमएच.19.एस.3457) सिमेंटच्या गोण्या घेऊन शाहुनगराकडे जात होते. भोईटेनगर रेल्वे गेटजवळ पोहचल्यानंतर त्याच वेळी गुवाहाटी एक्सप्रेस येत असल्याचा सिग्नल मिळाल्याने गेटमनने गेट बंद केले. दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास गुवाहाटी एक्सप्रेस तेथून गेल्यानंतर रेल्वे गेट आता रेल्वे गेट उघडणारच म्हणून शेख ताहीर हे दोरीच्या सहाय्याने रिक्षा सुरू करण्यासाठी मागील भागाच्या इंजिनजवळ येवून त्यांनी रिक्षा सुरू केली. मात्र, रिक्षा गिअरमध्ये असल्याने ती सुसाट रेल्वेगेटच्या दिशेने धावत सुटली. यात रिक्षाची जोरदार धडक गेटला बसताच ते वाकले जावून तुटले. एवढेच नव्हे तर चक्क मालवाहतुक रिक्षा ही रेल्वे रूळाजवळ जावून थांबली.
मोठा अनर्थ टळला
गुवाहाटी एक्सप्रेस तेथून गेल्यावर काही सेंकदाच ही घटना घडली. दरम्यान, एक्सप्रेस भोईर्टनगर रेल्वेगेट येथून जात असतांना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतू, त्या ठिकाणाहून रेल्वे गेल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. रिक्षाच्या धडकेत रेल्वेगेट संपूर्ण वाकले जावून त्यात बिघाड झाला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
तात्काळ दुरूस्ती घेतली हाती
रिक्षाच्या धडकेत गेट तुटल्याची माहिती संबंधित रेल्वे अधिकार्यांना कळताच त्यांनी धाव घेत तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले. त्या अगोदर जुन्या रेल्वेगेटच्या सहाय्याने दोन्ही बाजू बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती. दुरूस्तीसाठी वेळ लागत असल्याचे पाहून काही वाहन चालकांनी बजरंग बोगद्याचा पर्याय निवडला होता. परंतू, मोठी वाहने तेथेच थांबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चालक रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
मालवाहतुक रिक्षाचालक शेख ताहिर यांना ताब्यात घेत रेल्वेगटमनच्या खोलीत बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे पोलिस आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे समजते. या घटनेमुळे झालेली वाहतुकी कोंडी अखेर अर्धा ते पाऊन तासानंतर रेल्वेगेटची दुरूस्ती झाल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतुक सुरळीत करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी देखील भोईटेनगर येथील रेल्वेगेट हे वाहनाच्या धडकेत तुटले होते. पून्हा शनिवारी असीच घटना घडली आहे. यामुळे वाहतुकदारांना नेहमीची डोके दुखी झाली आहे.