मालाची विक्रीनंतरही मोबदला नाही

0

सोयगाव। तालुक्यातील आठ गावातील शेतकर्‍यांना कापूस विक्रीनंतर पैसे दिले नाही. व्यापार्‍यांरी पैसे देण्यावरुन शेतकर्‍यांची वारंवार दिशाभूल करत सल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतकर्‍यांनी यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या मात्र यावर उपाययोजना न झाल्याने शेतकर्‍यांनी पाचोरा तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. हक्काचे शेतीमाल विकुनही शेतकर्‍यांना मोबदला मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेती लागवडीला सुरुवात झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळामुळे अगोदरच होरपळलेला असल्याने आणि व्यापार्‍यांकडून मालाची विक्री केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी संबंधीत प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

आठ गावातील शेतकरी
मोबदल्यात व्यापार्‍याने दिलेले पाचोरा बँकेचे धनादेश बाउंस झाल्याने कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कापूस विक्रीचे पैसे देण्यास टाळाटाळ करणार्‍या व्यापार्‍या विरोधात सोयगाव तालुक्यातील आठ गावातील शेतकर्‍यांनी व्यापार्‍यावर व बँक प्रशासनावर कारवाई करण्याच्या मागणी केली आहे. मंगळवारी एैन आषाढी एकादशीच्या दिवशी पाचोरा तहसील कार्यालयावर उपोषणाला बसले आहे.

85 लाखाचा कापूस खरेदी
सोयगाव तालुक्यातील तीडका येथील कापूस व्यापारी शेख हकीम शेख गणी यांनी नोटाबंदीच्या काळात तालुक्यातील बहुलखेडा, वरठाण, तिडका, बोरमाळ तांडा, वाकडी, बनोटी, पळशी, मुखेड, गोंदेगाव या आठ गावातील 50 शेतकर्‍यांकडून सुमारे 85 लाख रुपये किमतीचा कापूस उसनवारीवर खरेदी केला होता. त्या मोबदल्यात शेतकर्‍यांना संबंधित व्यापार्‍याने पाचोरा बँकेचे धनादेश देवून फसवणूक केल्याची तक्रार संबंधित शेतकर्‍यांनी पाचोरा तहसील कार्यालयात लाखी निवेदनाद्वारे केली आहे.

50 शेतकर्‍यांचे उपोषण
संबंधित शेतकर्‍यांचे धनादेश बाऊंस झाल्याने संबंधित शेतकरी या व्यापार्‍याकडे रकमेसाठी चकरा मारत असल्याने व्यापार्‍याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी पाचोरा तहसील कार्यालयासमोर 4 पासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. सोयगाव तालुक्यातील धरमसिंग सोळुंके, शरद पाटील, आनंद पाटील, अरुणाबाई गिरी यांचेसह 50 शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहे.