दुबई । भारातविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यास उताविळ झालेल्या पाकिस्तानचा आयसीसीने अपेक्शाभंग केला आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यासाठी भारतावर कोणातीही जबरदस्ती करता येणार नाही. उभय देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळण्यासाठी झालेल्या कराराचे भारत पालन करत नसल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नेहमीच करत आला आहे. वर्ल्ड इलेव्हन ट्वेन्टी 20 क्रिकेट मालिकेसाठी रिचर्डसन सध्या पाकिस्तानच्या दौर्यावर आहेत. यावेळी लाहोर येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना आयसीसीची भारत पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. रिचर्डसन म्हणाले की, भारत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास तयार नसेल तर आम्ही त्यांच्यावर दबाव आणू शकत नाही. दोन देशांंमधील क्रिकेट मालिका उभय देशांच्या संमतिने खेळवली जाते.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळली जावी असे आयसीसीला वाटते. पण दोन्ही देशांमधील राजकिय अस्थिरता असल्यामुळे त्याचा परिणाम क्रिकेटवर होत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होत नसली तरी आयसीसीच्या स्पर्धांंमध्ये हे दोन्ही देश एकमेकांविरोधात खेळतात. यावेळी बोलताना रिचर्डसन यांनी पाकिस्तानच्या तुलनेत आयसीसी भारताच्या बाजूने झुकलेले आहे हा आरोपही फेटाळून लावला.
पाकचा भारताला घेरण्याचा प्रयत्न
2014 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मालिका खेळण्यासंदर्भात एक करार झाला होता. या करारानुसार भारताला पाकिस्तानविरुद्ध 2015 ते 2023 या कालावधीत सहा किक्रेट मालिका खेळायच्या होत्या. पण बदलत्या राजकिय परिस्थितीमुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट मालिका खेळण्यास नकार दिला.
त्यानंतर येनकेन प्रकारे यामुद्दावरुन विविध मंचावर भारताला घेरण्याचा प्रयत्न पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करत आले आहे. जवळपास आठ वर्षांनंतर पाकिस्तानात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे पुनरागमन झाले आहे. 13 सप्टेंबरपासून पाकिस्तान आणि जागतिक संघात तीन ट्वेन्टी 20 इंडिपेंडस चषक सामने खेळले जात आहेत. या मालिकेनंतर पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने पुन्हा खेळले जातील अशी आशा बाळगण्यात आली आहे.