भुसावळ (प्रतिनिधी) : लोकसंख्येच्या तुलनेत अधिक असलेल्या मालेगावपेक्षा भुसावळात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या अधिक असल्याने अधिकारी करतात तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित करीत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यंत्रणेवर ताशेरे ओढले. कोरोनावर नियंत्रण मिळवता न आल्याने पालिका, महसूल प्रशासन, आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना त्यांनी फैलावर घेतले. विशेष म्हणजे पानटपर्या व चहाची दुकाने परवानगी नसताना सुरू झाली कशी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत पालिका प्रशासनाकडून कुठलीही ठोस कृती होत नसल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी करूणा डहाळे यांना तीन महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर जाण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच पालिका मुख्याधिकारी पदाचा पदभार उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांच्याकडे सोपवला.
अधिकार्यांना सूचक इशारा
भुसावळात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढणारी संख्या व मृत्यूचे प्रमाण हे सर्वाधिक असल्याने जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांना फैलावर तातडीने नियंत्रणासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शहरात सर्वच दुकाने सुरू झाल्याच्या प्रकारावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कारवाईचे आदेश दिले. मुख्याधिकार्यांना तीन महिन्याच्या रजेवर पाठवत असल्याचे सांगून यापुढे गंभीर परीस्थितीत कुणी अधिकारी काम करणार नाहीत त्यांचीदेखील अशीच परीस्थिती होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, जिल्हाधिकार्यांनी राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांसह निमा संघटनेच्या डॉक्टरांच्या बैठकीचे आयोजन केले. काही पदाधिकार्यांनी यावेळी समस्या मांडल्या.
आजपासून उपजिल्हाधिकार्यांकडे भुसावळचा पदभार
मुख्याधिकार्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यानंतर भुसावळचा पदभार उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारपासून उपजिल्हाधिकारी भुसावळचा पदभार सांभाळणार आहेत. शहरात सरसकट सर्वच व्यावसायीकांने दुकान खुली केली आहेत तसेच पानटपर्या तसेच चहाच्या लोटगाड्या व अन्य व्यावसायीकांनी व्यवसाय सुरू केल्याने त्यांच्यावर काटेकोरपणे कारवाई करण्यासह मास्कविनाच बाहेर पडणार्या नागरीकांवर धडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे. अनेक दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्स पाळले जात नसून सायंकाळी पाचनंतरही (अत्यावश्यक सेवा वगळता) अन्य दुकाने सुरू राहत असल्याने अशा दुकानांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
यांची होती बैठकीला उपस्थिती
मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल, मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, डॉ.किर्ती फलटणकर उपस्थित होत्या.
भुसावळातील लोकप्रतिनिधींची स्वतंत्र घेतली बैठक
जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी शहरातील लोकप्रतिनिधींचीदेखील सविस्तर बैठक घेतली. यावेळी अनेक पदाधिकार्यांनी आपापली मते मांडली तर जिल्हाधिकार्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. या बैठकीतला भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे आदींची उपस्थिती होती.