भुसावळ : तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सातबारा उतार्यावरील बहिणीचे नाव इतर अधिकार नोंदमधून कमी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्या यावल तालुक्यातील मालोदच्या कोतवालासह खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केल्याने महसूल विभागातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. जहाँगीर बहादुर तडवी (56, रा.मालोद, ता.यावल, जि.जळगाव) असे अटकेतील लाचखोर कोतवालाचे तर मनोहर दयाराम महाजन (45, रा.किनगाव ता.यावल) असे खाजगी पंटराचे नाव आहे. मंगळवार, 22 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी करण्यात आला.
किनगावात एसीबीचा सापळा यशस्वी
यावल तालुक्यातील नायगावातील 50 वर्षीय तक्रारदार यांची सावखेडासीम, ता.यावल येथे शेत गट क्रमांक 281 मधील एक हेक्टर 21 आर शेतजमीन असून जमिनीच्या सातबारा उतार्यावरील इतर अधिकार नोंदमधील तक्रारदार यांची बहिण कमलबाई यांचे नाव मंडळाधिकारी, किनगाव यांच्याकडून कमी करून देणार असल्याचे सांगत किनगाव मंडळाधिकार्यांच्या नावाने पाच हजारांची लाच मालोद कोतवाल जहाँगीर तडवी याने मंगळवार, 22 रोजी मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आल्यानंतर लाचेची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. किनगाव मंडळाधिकारी यांच्या कार्यालयासमोरील विद्या जनरल स्टोअर्स संचालक मनोहर महाजन यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याचे आरोपी तडवी याने सांगितल्यानंतर तक्रारदाराने लाच रक्कम महाजन यांच्याकडे देताच पंचांसमक्ष त्यास अटक करण्यात आली व नंतर तडवी यालाही अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा एसीबीचे नाशिक पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (रीडर) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.