यावल : तालुक्यातील मालोद गावातील ग्रामपंचायत कार्यालयातून चोरट्यांनी सीसीटीव्हीसह एलईडी टीव्ही व डीव्हीआर लांबवल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
चोरट्यांची मजल ग्रामपंचायतीपर्यंत
शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई कुरबान तडवी हा साफ-सफाई करण्यासाठी गेला असता त्याला ग्रामपंचायत दरवाजा उघडा दिसला व आत जाऊन पाहिले तर ग्रामपंचायत बाहेर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा, आतील एलईडी टीव्ही व सीसीटीव्ही कॅमेराच्या डीव्हीआर चोरीला गेल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने ग्रामसेवक राजू तडवी यांना यासंदर्भात माहिती दिली व तडवी यांनी या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पोलिसांना कळवले. प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशित कांबळे, हवालदार नरेंद्र बागूले हे पथकासह दाखल झाले. 35 हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबवल्याप्रकरणी ग्रामसेवक राजू अन्वर तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.