माळेगावात भाजपने राष्ट्रवादीला दिला धक्का!

0

बारामती । बारामती तालुक्यातील माळेगाव या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा नगरसेवक सध्या अज्ञात स्थळी आहेत. विद्यमान सरपंच जयदीप तावरे यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी विद्यमान 17 सदस्यांपैकी 12 सदस्य नाराज असून ते एकत्रितपणे अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच माळेगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत कमळाने चांगलाच धक्का दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे धाबे दणाणले असून मंगळवारी होणार्‍या बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीच्या मतदानावर याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दैनिक जनशक्तिने वेळोवेळी रस्त्यांच्या समस्या मांडल्या
बारामती तालुक्यातील माळेगाव ही मोठी ग्रामपंचायत असून बारामतीपासून अवघ्या आठ किमी अंतरावरती आहे. माळेगाव साखर कारखाना, शिवनगर विद्याप्रसारक मंडळ तसेच इतर शैक्षणिक संस्था माळेगावमध्ये आहेत. त्यामुळे माळेगाव ग्रामपंचायतीवर सरपंच पदाच्या माध्यमातून भाजपने कमळ फुलविण्याचा डाव आखला असून यास पालकमंत्री गिरीश बापट यांनी खंबीरपणे पाठिंबा दिल्यास खर्‍या अर्थाने भाजप बारामती आपले पाय रोवण्यास सक्षम असल्याचे मानले जाईल असे मत व्यक्त केले जात आहे. माळेगाव ग्रामपंचायतीच्या अनेक समस्या विशेषत: रस्त्यांच्या बाबतीत दैनिक जनशक्तिने वेळोवेळी मांडलेल्या आहेत. याचा परिणाम म्हणून सध्या माळेगावमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या कामाच्या ठेकेदारीवरूनच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. भाजपचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला असून त्यास यश मिळत आहे.

तालुक्यातील भाजप नेते नावापुरतेच
माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर भाजपची सत्ता असून ही सल राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोळ्यात आहेच त्यामुळे वेळोवेळी या कारखान्यावर टिकेची झोड उठविली जाते. परंतू माळेगावमधील भाजपच्या नेत्यांनी एकजुटीने लढत देऊन ग्रामपंचायतही हस्तगत करण्याचा चंग बांधला आहे. मात्र तालुक्यातील भाजप नेते हे नावाला उरले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधल्याची चर्चा नेहमीच होत असते. यात माळेगावचे भाजप नेते मात्र पक्षवाढीच्या विचारात असून पक्ष विस्तारीत करण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. हे इथे विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल असे आहे.

पुन्हा कमळ फुलले तर पुनरावृत्ती
माळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला ही नामुष्किची घटना असून बालेकिल्ल्यातच चांगलेच आवाहन निर्माण होणार आहे. 1995मध्ये राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन सरपंच भालचंद्र तावरे यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत 1997-98ला ग्रामपंचायतीत भगवा फडकवून अजित पवार यांची दमछाक केली होती. आता तर राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता असून पुन्हा कमळ फुलले तर इतिहासाची ही पुनरावृत्ती ठरू शकते, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.