माळेगाव कारखान्याच्या बदनामीचा डाव

0

बारामती । छत्रपती व सोमेश्‍वर या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाला धक्का लावू नका. मात्र, सोमेश्‍वरच्या कार्यक्षेत्रातील जेवढा ऊस नेता येईल तेवढा घेऊन जा जेणेकरून माळेगाव कारखान्याची बदनामी करता येईल व ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण केला जाईल, अशी परिस्थिती खासगी साखर कारखान्यावाले व काही राजकीय मंडळी करीत असल्याचा आरोप माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे यांनी केला आहे.

माळेगाव कारखान्याच्या मिलमधील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर याबाबत सभासदांना चुकीची माहिती दिली जात आहे. यातील एक महत्त्वाचा प्रसंग असा की, मिलमधील तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर कारखान्याचे जेष्ठ संचालक चंदरअण्णा तावरे, अध्यक्ष रंजनकुमार तावरे, सभासद राजाभाऊ देवकाते आदी मंडळी कारखान्यावर विशेष लक्ष ठेऊन होते. कामाच्या ठिकाणी रात्र-रात्रभर बसून होते. एका रात्री तर रात्री 1 वाजता या मंडळींना जेवण न मिळाल्यामुळे भेळ खावी लागली. ही वस्तुस्थिती उपस्थित कामगारांनी व अधिकार्‍यांनी जवळून पाहिली आहे. यावरसुध्दा विरोधक चुकीची माहिती पसरविताना दिसत होते. विशेष बाब म्हणजे विरोधकांनी रात्री 1 वाजता भेळ कुठे मिळाली अशी विचारणा केली. परंतु माळेगाव कारखान्याचे कॅन्टीन हे 24 तास चालू असते हे त्या विरोधकांना माहीत नसावे. कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर आलेली एकमेव ही अडचण आहे. मात्र ती दुरुस्त करण्यात फार वेळ घालविला नाही, असेही तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

9 लाख टन गाळपाचे उद्दीष्ट
माळेगाव कारखाना यंदाच्या हंगामाचे नऊ लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट नक्कीच पूर्ण करेल विरोधकांनी कितीही अडचणी तयार केल्या तरी त्या आम्ही पार करू. तसेच कारखान्याच्या सभासदांना व गेटकेन ऊस उत्पादकांना चांगलाच भाव देऊ, असा ठाम निर्धार अध्यक्ष तावरे यांनी व्यक्त केला.