मावळची जागा धोक्यात!

0
युती झाली तरी आणि नाही झाली तरी मतविभागणी निश्‍चित
स्थानिक नेत्यांमध्ये इर्ष्येतून वैर आणि राज्यपातळीवरील पक्षांचा वाद 
पिंपरी-चिंचवड : अविनाश म्हाकवेकर
युती झाली तरी आणि नाही झाली तरी मावळ लोकसभा मतदार संघाची जागा दोन्ही पक्षांसाठी धोक्यात आली आहे. कारण इथे लढत पक्षांपेक्षा दोन उमेदवारांत होत आहे. यातील एक म्हणजे भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप. त्यांनी थेट शिवसेनेलाच इशारा दिला आहे की, खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला तर आम्हाला जबाबदार धरू नका. यामुळे निदान या जागेपुरता तरी पेच निर्माण झाला आहे. कारण युती झाली तरी बारणे यांना जगताप मदत करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. आणि स्वतंत्र लढत झाली तर जगतापही उमेदवार असतील. साहजिकच दोन्ही पक्षांची मते एकमेकांना मिळणार नाहीत.
पक्षीय पातळीवर विचार करता सध्याच्या घडीला मतदार संघात ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका ताब्यात असलेल्या भाजपची ताकद जादा वाटत असली तरी तो मोदी लाटेचा परिणाम होता. तेथील लोक आणि स्वत: जगताप यांची मूळ विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाही. त्यामुळे युतीत सेनेला मतदानाचा निरोप आला तरी आदेश पालन, संघशिस्त वगैरे त्यांना कोणाला माहित नाही. साहजिकच शिवसेनेला मतदान होणार नाही. तसेच बारणे विद्यमान खासदार असल्याने त्यांनी केलेली कामे आणि कट्टर शिवसैनिक त्यामुळेही त्यांची मते भाजपाला मिळणार नाहीत. साहजिकच युती झाली तरी आतून ती दुभंगलेलीच राहणार आहे. त्यामुळे ही जागा धोक्यात येवू शकते.
भाजपची ताकद म्हणजे पक्षांतर लाटेतील विजय
लोकसभा निवडणुकीला अजून पाच-सहा महिन्यांचा अवधी आहे. आघाडी, युती, जागा वाटप असे काहीही चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, ओसरलेली मोदी लाट आणि चार वर्षांपासूनची सेना-भाजपमधील दुही यामुळे अनेक मतदारसंघांचा अंदाज येत आहे. यातीलच एक म्हणजे मावळ. या मतदारसंघात कर्जत, उरण, पनवेल, मावळ, पिंपरी व चिंचवड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातील तीन आमदार भाजपचे, दोन शिवसेनेचे व एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. तसेच सहा पैकी पिंपरी व चिंचवड हे शहरी मतदारसंघ सर्वाधिक मतदारसंख्येचे आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची जवळून पारख मतदारांना आहे. मोदी लाटेत राज्याचे चित्र उलटेपालटे झाले होते. पक्षांतर करणारे सर्वजण निवडून आले होते आणि भाजपची ताकद वाढली. मावळमध्येही हा परिणाम तळातील ग्रामपंचायतींपासून दिसतो आहे. साहजिकच ही ताकद त्यांची मुळची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे निवडणुकीपर्यंत हवा कशी असणार यावर ताकदीचे गणित अवलंबून राहील. दोन्ही उमेदवार पूर्ण मतदारसंघाला परिचित आहेत. कारण जगताप यांनी मागील निवडणूक लढविली होती, तर बारणे खासदार आहेत. परंतू, साडेचार वषार्र्त कोणाचा संपर्क अधिक राहिलेला आहे आणि किती कामे झाली आहेत यावरही मतदारांची पसंती राहणार आहे.
विद्यमान खासदाराच्या पराभवाला जबाबदार नसू
जगताप व बारणे यांच्यातील वैर सामान्य माणसापर्यंत माहित आहे. एकमेकांच्या कुरापती ते पत्रकबाजीतून चव्हाट्यावर आणतात. त्यामुळे युती होणार नाही आणि भाजपकडून जगताप उमेदवार असतील हे गृहित धरून विजयाची गणिते मांडली जात होती. कारण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कोठेच चित्रात नव्हती. आता मात्र युती होणार हे निश्‍चित मानले जात आहे. साहजिकच सलग दोन वेळा खासदार या मुद्द्यावर ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. त्यामुळे जगताप यांना निवडणूक लढता येणार नाही. तसेच मागील निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी थेट लढून मिळणार नाही. मात्र, जगताप आपले उपद्रवमुल्य दाखवणार हे निश्‍चित आहे. कारण थेट पत्रकार परिषदेत ते म्हणाले – युती झाली तर आनंदच आहे. भाजपकडे विजयी होईल अशी ताकद आहे. मात्र ही जागा शिवसेनेकडे गेली तर त्या पक्षाने जिंकून येवू शकेल असा उमेदवार द्यावा. नगरसेवक निवडून आणण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्यांना बुथप्रमुख सुद्धा नेमण्यासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत, अशांना उमेदवारी देऊन शिवसेनेने आपला पराभव पत्करू नये. तसे झाल्यास शिवसेनेने नंतर आम्हाला जबाबदार धरू नये. आता इशाराच आहे.
लक्ष्मण जगताप बोले; स्थानिक भाजप डोले
जगताप यांनी वैयक्तिक पातळीवर इशारा दिला आहे असे मानले आणि प्रत्यक्ष युती झाल्यावर भाजपचे आदेश आले तरी सेनेला मतदान केले जाणार नाही. कारण जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते हे संघ परिवारातील नाहीत. ते भाजपमध्ये आले म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाला स्थान मिळाले हे सत्य आहे. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर अवलंबून आहे. आदेश, शिस्त, दंड, प्रणाम, शाखा, बौद्धिक असले काही त्यांना माहित नाही. पक्षालाही हे माहित आहे. त्याचमुळे जगताप यांचा इशारा असला तरी पक्षही त्याच बाजूचा आहे. कारण इथल्या स्थानिक भांडणात त्यांना स्वारस्य नसले तरी राज्यपातळीवर सेनेने केलेले आरोप, मानहानी, हेटाळणी हे त्यांना त्रासदायक झालेले आहे. यातूनच जगताप यांच्या रुपाने दबाब टाकून जागा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. अशीच भूमिका शिवसेनेची असणार आहे. बारणे यांनी प्रत्त्युतर दिले नसले तरी भाजपच्या मतांचा आपल्या विजयात वाटा होता हे त्यांना मान्य आहे. साहजिकच पाच वर्षांतील कामगिरी, वैयक्तिक प्रतिमा आणि पक्षाची व्होट बँक याच आधारे त्यांना मते मिळणार आहे. नैसर्गिक न्यायाने सेनेकडे जरी जागा गेली तरी आम्ही तुम्हाला मदत करतो मुंबईमधील विशिष्ठ एक-दोन जागा आम्हाला द्या असे मुद्दे भाजपकडून येवू शकतात.
मते राष्ट्रवादीच्या झोळीत?
अशा या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होवू शकतो. दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी स्पर्धेत नव्हती. मात्र, अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे नाव आले आणि सगळी समीकरणे बदलली आहेत. जगताप हे पवारांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी जरी पक्ष सोडला असला तरी भावनिक पातळीवर शरद पवार यांच्याजवळचे आहेत. त्यातच स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: म्हटले आहे की, पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. या दोन बाबींवरच ही सगळी मते राष्ट्रवादीकडे जावू शकतात. या जर तरच्या बाबी वाटल्या तरी युतीसाठीची ही जागा धोक्यात येवू शकते हे आजच्या घडीला वास्तव आहे.