मावळच्या पवित्र मातीने शिवरायाचा इतिहास रचला : शिवशाहिरांनी व्यक्त केल्या भावना

0

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे आणि मावळच्या पवित्र मातीने शिवरायाचा इतिहास रचला गेला आहे. याच मातीतून आपण घडलो असल्याचे गौरोवोद्गार महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर, बाबासाहेब पुरंदरे यांनी येथे व्यक्त केले. येथील छत्रपती ‘श्री शिवशंभो’ स्मारक समिती आणि स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजाचे’ उद्घाटन प्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते महानाट्याचे उद्घाटन करण्यात आले. तर श्रीमंत सरदार दाभाडे सरकार यांचे घराण्यातील वंशजांच्या हस्ते देवीची आरती करून प्रयोगाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी विशेष पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी अध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, अजय भोसले, महेश लडकत, चित्रा जगनाडे, मयूर ढोरे, केशवराव वाडेकर, अंजलीराजे दाभाडे, उमाराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, चंद्रसेनराजे दाभाडे, शंकरराव शेलार, वसंतराव भेगडे पाटील, शंकरराव शेळके, संग्राम काकडे, रविंद्र भेगडे, गुलाबराव म्हाळसकर, संयोजक सुनील शेळके, संतोष भेगडे पाटील तसेच आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आदर्शाचे संस्कार होणे गरजेचे
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दैदिप्यमान असून त्याचे अनुकरण होणे गरजेचे असल्याचे सांगून शिवशाहीर पुरंदरे म्हणाले की, पुढच्या पिढीला शिवरायांच्या आदर्शाचे संस्कार होणे गरजेचे आहे. तर शिवरायांच्या राज्यकारभारातील वैशिष्ठयाचे जतन होणे सध्याच्या काळाच्या दृष्टीने आवश्यक आहे, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. यावेळी पुरंदरे यांचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. विक्री झालेल्या तिकीटांमधून लकीड्रॉ काढण्यात आला. विजेत्यास उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते तलवार भेट देण्यात आली. प्रास्तविक माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले. स्वागत संतोष भेगडे पाटील यांनी केले. सूत्रसंचलन माजी सभापती सुरेश दाभाडे व विनया केसकर यांनी केले