राष्ट्रवादी मेळाव्यात केले मार्गदर्शन
शिरगावः तालुक्यात जास्त प्रमाणावर ग्रामीण भाग आहे आणि या लोकांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. शाळा, महाविद्यालय, सहकारी संस्था अशा जागांवर शहरी लोकांचा पगडा असतो. त्यामुळे याचा फायदा ग्रामीण लोकांना होण्यासाठी मर्यादा पडतात. या लोकांची मग इकडे जाव ही तिकडे अशी कोंडी होते. मावळ तालुक्यात गेली 25 वर्ष भाजपची सत्ता आहे तरीही मावळचा विकास जेवढा व्हायला हवा होता तेवढा झालेला दिसून येत नाही. याला जबाबदार कोण असा विचार नागरिकांनी केला पाहिजे. त्यामुळेच मावळातील चित्र बदलवण्याची ताकद फक्त ग्रामीण भागातच आहे, असे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोमाटणे येथे आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मावळ राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश ढोरे, रमेश गायकवाड, शुभांगी राक्षे, हवेलीच्या सभापती हेमलता काळोखे, विठ्ठलराव शिंदे, अशोक घारे, चाबुराव कडू, मधुकर कंद, यदुनाथ डाखरे, विजय काळोखे, सुरेश चौधरी, दिलीप खळदे, सुर्यकांत काळोखे आदी उपस्थित होते.
जाणीवपूर्वक गट तट तयार केले
पुढे नेवाळे म्हणाले की, तालुक्यात गट तट नाहीतच, परंतु हे जाणीवपूर्वक गट-तट तयार करत आहेत असेच वाटते. त्यामुळे जर मावळ तालुका राष्ट्रवादीच्या ताब्यात आणायचा असेल तर जिल्हा आणि राज्य नेतृत्वाने गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांना विचारात न घेता काही निर्णय परस्पर घेतले जात आहेत ही बाब न पटणारी आहे. जर आम्हाला विश्वासात घ्यायचे नसेल तर आमच्यावर असणार्या जबाबदारीचे काय, ती असून काय कामाची, वरिष्ठांनी जो निर्णय घेतला. त्याला आम्ही कधीच विरोध केला नाही आणि करणारही नाही, परंतु आम्हाला न विचारता घेल्यास मनात शंकेची पाल चुकचुकते. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपपेक्षा जास्त मते राष्ट्रवादी पक्षाने घेतली तेव्हा तालुक्यातील नेतृत्व चांगले होते आणि काही महिन्यातच त्यांना न विचारता घेण्या इतपत ते बेजबाबदार झाले आहेत का?
राजीनाम्यांचा विचार केला नाही
आम्ही सर्व वरिष्ठ नेत्यांना सुमारे 350 पदाधिकार्यांनी आमचे राजीनामे दिले आहेत. त्याला काही महिने झाले तरी याचा साधा विचार होत नाही. आम्ही काय समजायचे. ज्यांनी बंडखोरी केली त्यांना चांगली पदे दिली जातात, मग निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय? आज ग्रामीण भागात पवना बंद जल वाहिनी, नव्याने होवू घातलेला रिंग रोड अशा प्रकल्पाने लोक भूमिहीन होण्याच्या भीतीने भयभीत आहेत. तालुक्यातील नेतृत्व नुसते आम्ही एक इंच जमीन जावू देणार नाही, असे वरवर बोलत आहेत. हे प्रकल्प होण्यासाठी आतून प्रयत्नशील आहेत तर हे प्रकल्प थांबले का नाहीत? ग्रामीण भागातील शेतकरी नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. शेती व्यावसायिकांच्या घशात घालून नुसते पैसे खायचे का? कार्यक्रमाचे नियोजन दत्ता शेवाळे, विष्णू मुर्हे, राकेश घारे, भारत भोते, धनंजय राक्षे, उत्तम घोटकुले, नंदू गराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण मुर्हे यांनी केले.