धरणातील पाण्याचा विसर्ग
वडगाव मावळ-मावळ तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे धरणातील ज्यादा पाणी नदीपात्रांमध्ये सोडल्याने सर्वच नद्यांना महापूर आलेले आहेत. गेले काही दिवस मावळ तालुक्याच्या सर्व विभागात जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातही धरण परिसरात तर संततधार पाऊस होत असल्याने पवना, वडिवळे, आंद्रा, जाधववाडी, कासारसाई, मळवंडी तसेच टाटा कंपनीची सर्वच धरणे 100 टक्के भरली असून ज्यादाचा विसर्ग नद्यांमध्ये सोडल्याने नद्यांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. मावळ तालुक्यातील पवना, इंद्रायणी, आंद्रा, कुंडलिका, सुधा या नद्यांना महापूर आलेले आहेत.
दररोज पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातील अतिरिक्त पाण्यामुळे या नद्या तुंडुंब भरून वाहत आहेत. मान्सूनच्या पावसाचा जोर पश्चिम पट्ट्यातील डोंगरी विभागात सर्वाधिक असून सर्वच धरणे या पट्ट्यात आहेत. पवना धरण, वडिवळे धरण, आंद्रा धरण तसेच जाधववाडी धरण ही मावळ तालुक्यातील महत्वाची धरणे असून पवना नदीकाठची गावे पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकालात निघालेला आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाणी पुरवठ्यास यामुळे मदत होणार आहे.