मावळ तालुक्यातून मूल्यवर्धन शिक्षण प्रकल्पास सुरुवात

0

वडगाव मावळ : महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथय्या फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मूल्यवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम कशा पद्धतीने घेता येईल? याबाबत मावळातील 24 केंद्रातून 48 शिक्षक व 16 केंद्रप्रमुखांना मुथय्या फाउंडेशन प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर आणि शांताराम कदम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे नियोजन गटविकास अधिकारी नीलेश काळे, विस्तार अधिकरी अहमद मोमीन, मूल्यवर्धन तालुका समन्वयक मनीषा कारंडे, सविता पाटील, परुळेकर विद्यानिकेतनचे विश्वस्त दत्तात्रय रेगे, मुख्याध्यापिका प्रतिभा चौधरी, आरती कुंडले यांनी केले. रामराव जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

शिक्षणमंत्र्यांचा निर्णय
न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांची रुजवणूक मुलांमध्ये व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात सप्टेंबर, 2015 रोजी मावळ तालुक्यातील दारुंब्रे, बौर आणि बेबेड ओहोळ या केंद्रांमधील शाळांमध्ये झाली. यामध्ये विद्यार्थ्यांवर कृतीतून संस्कार केले जातात. मूल्यांची रुजवणदेखील कृतीतूनच करण्यात येते. सुरुवातीला तत्त्वता मान्यता मिळालेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. उपक्रमात राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.