मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा

0

कार्यकर्त्यांनी केली पक्षश्रेष्ठींकडे मागणी

तळेगाव दाभाडे : आगामी विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा. या काँग्रेस पक्ष श्रेष्ठीकडे केलेल्या मागणीमुळे तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचे प्रबळ दावेदार आणि कार्यकर्ते यांची द्विधा मनस्थिती झाली असून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षी सन 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूक आघाडी होण्याची शक्यता असून पक्षाश्रेष्टीकडून अंतिम निर्णयाकडे वाटचाल चालू आहे.

मुंबईत झाली आढावा बैठक

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे मुंबईत झालेल्या आढावा बैठक नुकतीच पार पडली. काँग्रेस पक्षाचे जेष्ठनेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, माजी युवक अध्यक्ष रोहिदास वाळुंज, संभाजी राक्षे यांच्या शिष्टमंडळाने मावळ विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी केली आहे. मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार वेळा पराभव पत्करावा लागला आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारल्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकरिता मावळ विधानसभेची जागा सोडावी, अशी मागणी तालुक्यातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यासह कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठीकडे केली आहे.

राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मावळ विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीत मिळेल असे गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख दावेदारांनी निवडणूक पूर्व हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र काँग्रेस पक्षाच्या मावळ तालुक्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकार्‍यांनी मावळची जागा काँग्रेस पक्षालाच सोडावी अशी आग्रही मागणी केल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चलबिचल निर्माण झालेली असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या मागणीचे स्वागत केले जात आहे.