मासुळकर कॉलनीच्या मंडईला विक्रेत्यांची प्रतीक्षा

0

विक्रेते नसल्याने मंडईत मोकाट जनावरे, जुगारी व मद्यपींचा वावर

पिंपरी-चिंचवड : महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून मासुळकर कॉलनी येथे किमान एकरभर जागेत सुसज्ज भाजी मंडई उभारली. परंतु, भाजी विक्रेत्यांच्या अनुपस्थितीमुळे मंडईतील जागा मोकाट जनावरे, पत्ते खेळणारे व मद्यपींचा अड्डा बनली आहे. ही मंडई सुरू करण्याची मानसिकता ना येथील लोकप्रतिनिधींनी ठेवली ना महापालिका प्रशासनाने. त्यामुळे या परिसरात सुसज्ज भाजी मंडई उभारुनही काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे अनेक चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर भाजीविक्रेते ठाण मांडून असतात. परिणाम वाहतुकीला अडसर निर्माण होऊन कोंडी उद्भवते. मंडईबाबतचे अपयश नेमके कुणाचे, हा प्रश्न येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून पडला आहे.

शहरातील महत्त्वपूर्ण परिसर
पिंपरीतील मासुळकर कॉलनी प्रभाग म्हणजे येथील नेहरूनगर, यशवंतनगर व संत तुकारामनगर परिसरापेक्षा वेगळा व उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. त्याबरोबरच खेळाचे मैदान, व्यायामशाळा, स्केटिंग ग्राऊंड, बास्केटबॉल मैदान, अशा अनेक आरक्षणांचा विकास झालेला भाग व नागरिकांच्या मुबलक सोयी उपलब्ध असणारा भाग म्हणूनही ओळखला जातो. या सर्व आरक्षणांबरोबरच सुसज्ज भाजी मंडईचे आरक्षणही अनेक वर्षांपासून विकसित केले आहे. तरीदेखील या भाजी मंडईचा भाजी विक्रेत्यांनी कधी वापर केला आहे, असे चित्र अद्याप नजरेस पडलेले नाही.

भाजी विक्रेते रस्त्यावरच
आम्ही भाजी मंडईत बसायला तयार आहोत. तसा आम्ही प्रयत्नदेखील केला होता. परंतु, सोसायट्यांखाली फिरते भाजी विक्रेते येत असल्यामुळे येथील रहिवासी मंडईत येण्याचे कष्ट घेत नाहीत. त्यामुळे आमच्या मालाची विक्री होत नाही, असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. रसरंग चौक ते अजमेराकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या किंवा खाली पदपथावर अनेक भाजी विक्रेते बसलेले दिसतात. आधीच दुकानदारांनी रस्ते अरुंद केले असताना त्यात या भाजी विक्रेत्यांची भर पडली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन मोठ्या अपघाताची शक्यता आहे.