जळगाव। धानवड पाझर तलावात सोडण्यात आलेल्या मासेंच्या रखवालीसाठी ठेवण्यात आलेल्या दोन रखवालदारांना मासे चोरीसाठी आलेल्या दहा ते वीस जणांनी लाकडी दांड्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या दरम्यानात घडली. मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली असून एकाची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते. यातच दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे.
यापूर्वीही केला होता चोरीचा प्रयत्न
जखमींनी दिलेली माहिती अशी की, धानवड शिवारातील भवानी मंदिराजवळ सुरेश जावरे यांचे तलाव असून त्यात मासे सोडण्यात आले आहे. या मासेंची चोरी होवू नये यासाठी जावरे यांनी अकील कलीम पिंजारी (वय-32), इरफान शेख (वय-27, दोन्ही रा. मेहरूण) यांना रखवालदार म्हणून कामाला ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील काही भामटे तलावावर येऊन मासे चोरून घेऊन जात असतांना अकील पिंजारी व इरफान शेख यांना हटकल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग करून चांगलाच दम भरला होता.
मासेही नेले सोबत 10 हजार केले लंपास
आज गुरूवारी सकाळी अकील आणि इरफान हे तलावावर रखवाली करत असतांना दहा ते वीस चोरटे त्या ठिकाणी येऊन मासे चोरून घेवून जात होते. हा प्रकार अकील व इरफान यांच्या लक्षात येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत त्यांना मासे घेऊन जाण्यास विरोध केला. यानंतर त्या चोरट्यांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना धक्काबुक्की केली. दोघांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. मात्र, चोरट्यांनी लाकडी दांडे तसेच लाथा-बुक्क्यांनी अकील आणि इरफान यांना बेदम मारहाण केली. दोघांनी कसे तरी जीव मुठीत धरत तेथून पळ काढला. परंतू, डोक्याला व तोंडाला मारहाण केली असल्याने दोघीही चक्कर येऊन रस्त्यात कोसळले. त्या ठिकाणी ये-जा करीत असलेल्या नागरिकांना दोन्ही जखमी अवस्थेत दिसून आल्याने त्यांना लागलीच दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
डोक्यावर मारहाण; जबडे मोडले
इरफान यांच्या डोक्यावर व तोंडावर मारहाण केली असल्याने त्याच्या जबड्याने हाडच मोडले गेले. त्यामुळे त्याची प्रकृति चिंताजनक आहे. अकील याच्या डोक्यावरही मारहाण केल्याने तो गंभीर जखमी आहे. दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मासे चोरट्यांनी मासे ही चोरून नेले आहे तर रखवालदारांकडे असलेले मालकाचे 10 हजार रुपयेही चोरून नेले आहे, अशी माहिती जखमींनी दिली. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गर्दी होती.