माहिजीजवळ अप दुरांतो एक्स्प्रेसवर दरोडा

0

विवाहितेचे मंगळसूत्र लांबवले : सिग्नल ब्रेक करून थांबवली गाडी

भुसावळ- पाचोरा तालुक्यातील माहिजी स्थानक ते म्हसावद दरम्यान अप 12290 नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस थांबवून चोरट्यांनी दरोडा टाकत अनेक प्रवाशांकडील मुद्देमाल लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या प्रकरणी एका महिलेने ईगतपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सिग्नलमध्ये छेडछाट करून टाकला दरोडा
नागपूर-मुंबई या दुरांतो गाडीला भुसावळनंतर थेट कल्याण येथे थांबा तर ईगतपुरी येथे या गाडीला टेक्नीकल हॉल्ट आहे. चोरट्यांनी म्हसावद ते माहिजी दरम्यान रेल्वे सिग्नल यंत्रणेत छेडछाट केल्यानंतर सिग्नल रेड झाल्याने गाडी थांबली तर प्रवासी पहाटेच्या साखर झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील किंमती ऐवज लांबवण्यात आला. नेमक्या किती प्रवाशांना लुटण्यात आले याची अद्याप अधिकृत माहिती कळालेली नाही. गाडीतील बोगी क्रमांक एस- 4 मधून नागपूर ते मुंबई प्रवास करणार्‍या अनिता सीताराम चिंचोरीया (नागपूर) या विवाहितेच्या गळ्यातील 13 ग्रॅम वजनाचे व 32 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवल्याने ईगतपुरी लोहमार्ग पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करून तो भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, रेल्वे यंत्रणेच्या सिग्नलमध्ये छेडछाड करून टाकण्यात आलेल्या दरोड्यानंतर पोलीस प्रशासनाची गंभीर दखल घेतली असून नेमक्या प्रकारची माहिती जाणून घेतली जात आहे.