माहिती न देणार्‍या घरमालकांवर गुन्हे दाखल

0

दहशतवादाच्या पार्श्‍वभूमीवर हडपसर पोलिसांची कारवाई मोहीम

हडपसर : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामधील गंभीर गुन्हे भाडेकरूंमार्फत झाल्याचे समोर आले आहे. जागा, सदनिका, बैठे घर भाडेतत्त्वावर किंवा तात्पुरती वापरास देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची माहिती पोलिसांना कळविण्याचे कायद्याने बंधनकारक आहे. सरकारी कार्यालयात माहिती न दिल्याने घरमालकांवर हडपसर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दहशतवादाच्या पार्श्‍वभूमीवर माहीती न देणार्‍यांवर कारवाई करण्याची मोहीम हडपसर पोलिसांनी सुरू केली आहे.

हडपसर परिसरात भाडेकरूची संख्या जास्त आहे. ज्याप्रमाणे लोकसंख्या वाढत आहे त्याप्रमाणे गुन्ह्याची संख्या वाढताना दिसत आहे. परराज्यातील व विविध जिल्ह्यातील लोक या परिसरात व्यवसाय अथवा नोकरीनिमित्त राहण्यासाठी आलेले आहेत. कोणतीही खातरजमा न करता जुजबी तोंडी माहितीवर घरमालक आपले घर भाड्याने देत आहेत. नुकतीच पुणे शहरात एटीसद्वारे नक्षलवाद्यांवर कारवाई झाली. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे हे एटीस दहशतवाद तपास मोहिमेतून हडपसरला आलेले असल्याने त्यांनी त्याच पार्शवभूमीवर माहिती न देणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा दिसून येत आहे.

47 घरमालकांवर गुन्हे दाखल

हडपसर पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात भाडेकरू राहत आहेत. याबाबत सर्व भाडेकरुंची माहिती आमच्याकडे आलेली नाही. घरमालक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. माहिती न देणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 47 घर मालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सुनील तांबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर