माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेला तलवारीने कापण्याची धमकी

0

वाकड : दुकान सुरु करण्यासाठी माहेरहून पैसे आण. पैसे आणले नाही तर तलवारीने कापून टाकीन, अशी धमकी देत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार कुलकर्णी बाग नाशिक येथे घडला. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती अमित राजेंद्र कोठावदे (वय 30), सासरा राजेंद्र गंगाधर कोठावदे (वय 58), सासू लता राजेंद्र कोठावदे (वय 55), नणंद पूनम राजेंद्र कोठावदे (वय 29, सर रा. एच पी टी कॉलेज रोड, कुलकर्णी बाग, नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासर्‍यांकडून शारीरिक त्रास…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नाशिक येथे सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींनी तिला किरकोळ कारणावरून मानसिक व शारीरिक त्रास दिला. आई वडिलांकडून दुकान सुरु करण्यासाठी पैसे घेऊन ये, अशी मागणी केली. जर पैसे घेऊन आली नाही तर तलवारीने कापून टाकीन अशी धमकी दिली. विवाहितेच्या आई-वडिलांनी त्यांच्या विवाहामध्ये दिलेली दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, सोन्याची नथ असे स्त्रीधन काढून घेतले. यावरून पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस फौजदार ए. ए. मोमीन तपास करीत आहेत.