माहेश्वरी चौहानला कांस्यपदक

0

अस्ताना । भारताची अव्वल महिला नेमबाजी माहेश्‍वरी चौहानने येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावीत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सर्वोच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील स्कीट प्रकारात भारतीय महिला नेमबाजाने मिळविले हे पहिलेवहिले वैयक्तिक पदक ठरले. इतकेच नव्हे तर माहेश्वरीने नंतर रश्मी राठोड व सानिया शेख यांच्यासोबत भारताला महिलांच्या सांघिक स्कीट प्रकारात रौप्यपदकही मिळवून देत दुहेरी यशाची कमाई केली. या तिघींनी मिळून 190 गुणांची कमाई केली. पहिल्या स्थानावरील चीनच्या महिला संघाने 195 गुणांची नोंद करताना सुवर्णपदक पटकावले. तर यजमान कझाखस्तानच्या महिलांनी 185 गुणांसह कांस्यपदकाची निश्चिती केली.

त्याआधी माहेश्वरीने आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविताना आपल्या देशाला संस्मरणीय यश मिळवून दिले. दिवसाच्या प्रारंभी झालेल्या प्राथमिक फेरीत तिने 75पैकी 68 गुणांची नोंद करताना 22 स्पर्धकांमध्ये पहिल्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. तिच्यासह रश्मी राठोडनेही 64 गुणांची नोंद करतान अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत जागतिक विजेती चीनची मेंग वेई आणि थायलंडची जिएव्ह सुतिया अशा अव्वल स्पर्धकांचाही समावेश होता. अखेर मेंगने 55 गुणांसह सुवर्ण, सुतियाने 54 गुणांसह रौप्य, तर माहेश्वरीने 40 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.