मूळ शेंदुर्णीचा शिक्षणासाठी राहत होता जळगावात ; ऊसनवारीने घेतले होते तीन हजार रुपये
जळगाव/शेंदुर्णी – मित्राकडून ऊसनवारीने 3 हजार रुपये घेतले. व ते पैसे परत मिळावे म्हणून मित्रांकडून वारंवार फोन येत होते. या मित्राच्या तगाद्याला कंटाळून तेजस नंदकिशोर बारी वय 19 रा. बारी गल्ली, शेंदुर्णी या विद्यार्थ्यांने भूषण कॉलनीतील भाडेकरारावर राहत असलेल्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, तेजस नंदकिशोर बारी (वय-19) रा. शेंदुर्णी ता. जामनेर हा जळगावातील आयएमआर महाविद्यालयात बीबीएमच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. त्याच्यासोबत मयत तेजस बारी, दिपक नंदु महाजन आणि सौरभ नंदकिशोर राजपूत या तिघांनी मिळून मू. जे. महाविद्यालय परिसरातील पद्मालय हाईट्स येथे रूम करून राहत होते. दिपक रेडीमेक कपड्याचे दुकानावर कामाला तर सौरभ राजपूत हा रायसोनी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
जेवणाहून परतल्यावर मित्रामुळे प्रकार उघड
सोमवारी दिपक महाजन हा कामावरून खोलीवर आला. यावेळी सौरभ राजपूत हा वर्गातील दुसर्या मित्राकडे अभ्यासासाठी गेला होता. त्यामुळे खोलीवर एकटाच बसलेला होता. सर्वांची जेवणाची मेस एकाच ठिकाणी असल्याने दिपकने तेजसला मेसवर जेवणासाठी चलतो का असे विचारले. त्यावर मला भुक नसल्याचे तेजसने सांगितल्याने दिपक जेवणासाठी निघून गेला. रात्री 11.30 वाजता जेवण करून दिपक महाजन बाजूच्या रूममधील मित्रांसोबत आला असता रूमचा दरवाजा आतून बंद केलेला आढळला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर रामानंदनगर पोलिसांना फोन करुन माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.
आत्महत्येपूर्वी आला पैशांसाठी मित्राचा फोन
तेजसला पैशांची गरज होती. त्याला एका ठिकाणी तातडीने पैसे भरावयाचे असल्याने एका मित्राकडून 3 हजार रुपये घेतले. पैसे परत न मिळाल्याने मित्रांकडून तेजसला फोन येत होते. घटनेपूर्वीही तेजसला याच मित्राचा पैशांसाठी फोन आला. यावेळी तेजसने पैसे देण्यासाठी त्याला होकारही दिला. फोन ठेवल्यावर तेजसने एक ते दोन जणांना 3 हजार रुपये मागितले. मात्र पैसे मिळाले नाही. आता पुन्हा पैशांसाठी मित्राचा फोन येईल, या तगाद्यामुळे तेजसने जीवन संपविल्याची माहिती मिळाली आहे.
सायंकाळी आईला म्हणाला मेसचे पैसे पाठव
सोमवारी सायंकाळी तेजसेन त्याच्या आईला फोन केला आणि मेसचे पैसे द्यावयाचे असून ते पैसे पाठवून देशी असे सांगितले होते. यानंतर रात्री 12 वाजता कुटुंबियांना तेजसच्या आत्महत्येची वार्ता मिळाली. तेजसला एक लहान बहिण आहे. तेजसचे प्राथमिक शिक्षण जामनेरला झाले आहे. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात मंगळवारी शेंदुर्णी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.