नागपुरात सापडलेल्या भोसरीतील 16 वर्षीय मुलीचा प्रताप
पुणे : नागपूर येथे रस्त्याच्या कडेला रडणार्या 16 वर्षीय मुलीला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. या मुलीने भयानक कथानक रचले. आपण दहावीची हुशार विद्यार्थिनी असून, 98 टक्के मार्क्स पडलेले आहेत. आपण अनाथ असून, काका आपला सांभाळ करतो. परंतु, तो दररोज आपल्यावर लैंगिक अत्याचार करतो. म्हणून नागपुरात पळून आले आहे, अशी कथा तिने पोलिसांना सांगितली. त्यानुसार, नागपूर पोलिसांनी बलात्कार व पोस्को कायद्यानुसार तिच्या कथित काकाविरोधात गुन्हे दाखल करून प्रकरण भोसरी पोलिसांकडे पाठविले. परंतु, भोसरी पोलिसांनी केलेल्या तपासात सदर षोडशी निव्वळ खोटे बोलत असल्याची बाब उघड झाली. उलट ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या वडिलांनीच पोलिसांत दाखल केली होती. भावाने प्रियकरासोबत पाहिल्याने ती नागपूरला पळून गेली होती. परंतु, पकडल्यानंतर तिने बनावट कथानक रचून पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिला समज देत सोडून दिले व तिचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. या घटनेची सद्या पिंपरी-चिंचवड पोलिसांत जोरदार चर्चा होत आहे.
मुलीच्या खोटारडेपणामुळे पोलिसांची दमछाक
भोसरीत राहणारी 16 वर्षीय मुलगी मित्रासोबत पळून गेली होती. परंतु, तिचा मित्र तिला सोडून पळून आला. परिणामी, ती रस्त्याच्या कडेने रडताना पोलिसांना आढळून आली. नागपूर पोलिसांनी तिला ताब्यात घेत चौकशी केली असता, तिने अत्यंत धक्कादायक कथा सांगितली. आपण अनाथ आहोत, हुशार विद्यार्थिनी आहोत. परंतु, काका दररोज बलात्कार करतो. त्याने बलात्काराची व्हिडिओ क्लिपही तयार केलेली आहे, असे तिने पोलिसांना सांगितले. तिच्या सांगण्यावरून नागपूर पोलिसांनी या प्रकरणी भोसरीतील तिच्या कथित काकाविरोधात भारतीय दंडविधानाच्या कलमासह बालकांच्या लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा (पॉस्को)अंतर्गतही गुन्हे दाखल केले. प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने ते तातडीने भोसरी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले. तसेच, या मुलीलाही भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भोसरी पोलिसांनी या मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार वैगरे काहीही न झाल्याचे दिसून आले. अधिक तपास केला असता ती अनाथ नसल्याचेही उघडकीस आले व ती बेपत्ता असल्याबाबत तिच्याच वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली होती. तिने काका म्हणून ज्या व्यक्तीचे नाव सांगितले त्या नावाचा तिला कुणीही काका नव्हता. ते नावदेखील बनावट होते. या सगळ्या तपासानंतर ही मुलगी खोटी बोलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले व तसे भोसरी पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळवले.
मुलगी का पळाली?
या 16 वर्षीय मुलीला तिच्या भावाने तिच्या प्रियकरासोबत फिरताना पाहिले होते. त्यामुळे भाऊ घरी वडिलांना ही बाब सांगेल, या भीतीने या मुलीने प्रियकरासोबत पळ काढला व नागपूर गाठले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले. तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यातही ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. मध्यंतरीच्या काळात तिचा प्रियकर तिला एकटीला सोडून पळून आला. त्यामुळे ही मुलगी एकटीच नागपुरात अडकली. रस्त्याच्याकडेला तिला पोलिसांनी रडताना पाहिले म्हणून ती कुण्या समाजकंटकाच्या हाती लागण्यापासून बचावली, असेही पोलिसांनी सांगितले. मुलीच्या खोटारडेपणाबद्दल तिच्या कुटुंबीयांसह पोलिसांचीही चांगलीच दमछाक झाली. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याविरोधात काहीही कारवाई न करता समज देऊन सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी सांगितले.