मिनी मॅरेथॉनमध्ये अधिकार्‍यांसह धावले 172 जण

0

जनजागृतीसाठी राबविला उपक्रम

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये मतदार नावनोंदणी उपक्रम होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी, मतदारांना आपले नाव नोंदणी करावी याबाबत जनजागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने 305, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्यावतीने आज (शनिवारी) मतदान नोंदणी अभियानांतर्गत पुनावळे ते थेरगाव दरम्यान आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपजिल्हा निवडणूक अधिकार्‍यांसह 172 जण या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
रावेत येथील बास्केट ब्रीजपासून सकाळी सात वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी ‘झेंडा’ दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली. बास्केट ब्रीज, डांगे चौक, थेरगावातील वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमीपर्यंत मॅरेथॉन घेण्यात आली. यामध्ये सिंग, मतदार नोंदणी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, अग्निशामक विभागातील अशोक कानडे, प्रताप चव्हाण, ऋषीकेश चिपाडे, ज्ञानेश्‍वर भालेकर, क्रीडा विभागाचे पर्यवेक्षक विश्‍वास गेंगजे, सुभाष पवार, अनिल मगर, शिक्षक गोरक्ष तिकोणे, सुभाष जावीर, बन्सी आरवे, सोपान खोसे, लक्ष्मण माने, भाऊसाहेब खैरे यांच्यासह महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असे 172 जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

निवडणूक अधिकारी मोनिका सिंग यांनी नव मतदार नोंदणीचे महत्व सांगितले. मतदार याद्यांमध्ये अनेक त्रूटी असतात. कुठे वय, तर कुठे पत्ता चुकलेला असतो. त्यासाठी आपल्या मतदार ओळखपत्रामध्ये शु्द्धीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.