धुळे : शेवाळी फाटा कळंबीर डोंगरावर साक्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा फुकतांना पाच जणांना अटक केली. तसेच मिरचीच्या शेतातील गांजाची झाडे नष्ट करण्यात आली. कारवाईत दीड लाखांचा मुद्देमाल जप्त कारवाईमध्ये ३८ हजार रुपयांच्या गांजासह मोबाईल, मोटरसायकली असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेवाळी फाटा कळंबीर ता.साक्री गावात डोंगरावर बन्सीलाल धाकू पगारे याच्या घरासमोर गांजाची शेती होत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पथकाने यांनी डोंगरावर छापा टाकला.
गांजा फुकताना रंगेहात पकडले
बन्सीलाल धाकू पगारे याच्या घरासमोरच पाच व्यक्ती गांजा फुकतांना मिळून आले. त्यांच्या अंगझडतीत प्रत्येकाच्या खिशात गांजाच्या पुढ्या आढळून आल्यात. तसेच पगारे यांच्या घरासमोर असलेल्या वांगे, मिरचीच्या शेतात गांजाची झाडे आढळून आलीत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजा, मोबाईल, मोटरसायकली असा एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच पोलिसांनी गांजांची झाडे नष्ट केली. या प्रकरणी रमेश उर्फ गिरी सुपडू गोसावी रा.तिरंगा नगर साक्री, सागर भिकन शेवाळे रा. शेवाळी ता.साक्री, अशोक दिलीप शिंदे रा.आदर्श नगर ता. साक्री, अल्ताफ महंमद शेख रा.जुने पोस्ट ऑफिससमोर साक्री, बन्सीलाल धाकू पगारे रा.शेवाळी ता.साक्री यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक चैतन्या एस. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, साक्री डिवायएसपी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक कन्हैय्यालाल मोरे, प्रेमनाथ ढोले, धनराज पाटील, अमरसिंग वसावे, लक्ष्मीकांत वाघ, रविंद्र ठाकरे, गुलाब वसावे, विजयसिंग पाटील, तारासिंग पावरा यांनी ही कारवाई केली.